पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिने सायप्रसमध्ये येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना युद्धनौकांचा वेढा असताना कोणीही शांतपणे खेळू शकत नाही. मला आर्थिक दंडाची भीती नाही. हा निर्णय संपूर्ण वैयक्तिक असून, कुटुंबीय माझ्या पाठीशी आहेत, असे सांगितले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानवीर निश्चित होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या चार भारतीयांपैकी हम्पी एक होती. मात्र, सायप्रस हे युद्धग्रस्त पश्चिम आशियाई क्षेत्राच्या अगदी जवळ असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तिने रविवारी माघार घेतल्याचे जाहीर केले. सायप्रस हे सध्या युद्धक्षेत्राच्या अगदी जवळील बेट आहे. या बेटाच्या रक्षणासाठी युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. अशा वेळी इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी येताना मी अनेकदा विचार करून हा सर्वात कठीण निर्णय घेतला, असे हम्पीने सांगितले.
स्पर्धेतून उशिरा माघार घेतल्यामुळे हम्पीला मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते. यावर हम्पी म्हणाली, ‘‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ अशा दंडाची तरतूद यामुळेच ठेवते जेणेकरून खेळाडू वास्तवाबद्दल बोलणार नाहीत. मला त्याची भीती नाही. मी केवळ पैशासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी खेळत नाही, मला या खेळातून आनंद मिळतो म्हणून मी खेळते.’’
हम्पीच्या मते, ही स्पर्धा एका महिन्यासाठी पुढे ढकलता आली असती किंवा दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आयोजित करता आली असती. महासंघाला अन्य कोठेही ही स्पर्धा घेता आली असती. जर त्यांना सायप्रसमध्येच घ्यायची होती, तर परिस्थिती शांत होईपर्यंत महिनाभर प्रतीक्षा करायला हवी होती.
माघारीचा निर्णय घेण्यापूर्वी ‘फिडे’चे उपाध्यक्ष भारताचा ग्रँडमास्टर विश्वानाथन आनंद यांच्याशी चर्चा केली असली, तरी हम्पीने या चर्चेतील तपशील देण्यास नकार दिला. काही गोष्टी घडल्या, पण मला त्याविषयी बोलायचे नाही, असे हम्पी म्हणाली.
खेळण्यासाठी केवळ चांगले रिसॉर्ट असणे पुरेसे नसते, तिथले वातावरणही सुखद असावे लागते. या स्पर्धेसाठी मी तीन महिने कठोर सराव केला होता आणि मुलीलाही वेळ दिला नव्हता. माझे खूप नुकसान होणार आहे.– कोनेरू हम्पी, भारताची ग्रँडमास्टर
