कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझुमी ओकुहाराने सायनाचा १५-२१, २१-१५, २२-२० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट आघाडी जिंकत आघाडी घेतलेल्या सायनाला उर्वरित दोन सेटमध्ये आपला खेळ कायम राखता आला नाही, ज्याचा फायदा घेत ओकुहाराने सामन्यात बाजी मारली.

पहिल्या सेटच्या सुरुवातीला ओकुहाराने ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र सायनाने चांगली लढत देत ओकुहाराची आघाडी कमी केली. अखेर सलग ३ गुण मिळवत सायनाने ओकुहाराला पहिल्या सेटमध्ये मागे टाकलं. मध्यांतरापर्यंत सायनाने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर सायनाने आपल्या खेळाची गती वाढवत काही चांगले फटके खेळले. या जोरावर सायनाने पहिल्या सेटमध्ये १५-२१ अशी बाजी मारली.

दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं. आक्रमक फटक्यांचा वापर करत ओकुहाराने सायनाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. २१-१५ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत ओकुहाराने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. यानंतर निर्णयाक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलाच सामना रंगला. मात्र अखेरच्या क्षणात बाजी मारत ओकुहाराने सायनावर मात केली.