‘कोरिया ओपन सुपर सीरिज’च्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिच्या या विजयानंतर अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियावरुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. यामध्ये सर्वप्रथम बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन सिंधूचं अभिनंदन केलं.
“तिनं करुन दाखवलं. पी व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं. हे विजेतेपद मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय ठरली आहे. ‘त्या’ पराभवाची सिंधूने परतफेडच केली आहे”, असं ट्विट बच्चन यांनी केलं. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता. त्याचाच संदर्भ घेत बिग बींनी हे ट्विट केलं. त्यासोबतच त्यांनी सिंधूचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले. हे फोटो पाहता कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्याचा आनंद खुद्द बिग बींनी घेतला असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांच्याशिवाय चित्रपट दिग्दर्शक शूजित सकरारनेही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.
T 2550 – YEEEEEAAAHHHHHH !! SHE HAS DONE IT !! PV SINDHU WINS THE SUPER SERIES, IN KOREA .. 1ST INDIAN TO DO SO .. SWEET REVENGE !! pic.twitter.com/032W8vxdJX
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 17, 2017
Incredible P.V.Sindhu
— Shoojit Sircar (@ShoojitSircar) September 17, 2017
वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
पी व्ही सिंधूच्या या विजयानंतर अनेकांनीच तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात सिंधूने ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ अशा फरकानं विजय मिळवला.
या अटीतटीच्या सामन्यात सिंधू आणि ओकुहारा या दोघींनीही चिवट झुंज दिली. पण, सिंधूच्या आक्रमक खेळीपुढे ओकुहाराने हात टेकले आणि कोरियन ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.