कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आजचा दिवस भारतीयांसाठी संमिश्र ठरला. पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र परुपल्ली कश्यपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतला आपला फॉर्म कायम ठेवत सिंधूने दुसऱ्या फेरीत थायलंडच्या निकॉन जिंदपॉलच्या २२-२०, २१-१७ अशा दोन सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुढच्या फेरीत सिंधूची लढत २०१४ च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या मिनात्सू मितानीशी होणार आहे. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीच्या क्षणी पिछाडीवर पडलेल्या सिंधूने वेळीच सावरत पहिल्या सेटमध्ये बरोबरी साधली. अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सेटमध्ये अखेर जिंदपॉलची झुंज मोडून काढत सिंधूने पहिला सेट आपल्या खिशात घातला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात बाजी मारली.

समीर वर्माने हाँगकाँगच्या वोंग विंग की व्हिन्सेटवर २१-१९, २१-१३ अशी मात केली. मात्र भारताच्या परुपल्ली कश्यपला हाँगकाँगच्या सन वॅनकडून २१-१६, १७-२१, २१-१६ अशी हार पत्करावी लागली.  दुसरीकडे भारताच्या साई प्रणीतचंही स्पर्धेतलं आव्हान संपलेलं आहे. चीन तैपेईच्या त्झु वी वँगने साई प्रणीतला १३-२१, २४-२६ अशा फरकाने पराभूत केलं. पहिला सेट वँगने सहज जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याला साईप्रणीतने चांगली टक्कर दिली. मात्र अखेरच्या क्षणी जोर लावत वँगने सामन्यावर आपली मोहोर कोरलीच.