Kranti Gaud Record: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. हा सामना महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक सामना आहे. कारण आजवर लॉर्ड्सच्या मैदानावर महिलांचा एकही कसोटी सामना खेळला गेला नव्हता. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. आधी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना क्रांती गौडने ५ विकेट्स घेऊन मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
भारताची स्टार गोलंदाज क्रांती गौडचं नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर लिहिलं गेलं आहे. २२ वर्षीय मध्यमगती गोलंदाजाने या डावात इंग्लंडच्या ५ फलंदाजांना माघारी धाडलं. या डावात तिने १७ षटकात ३७ धावा खर्च करून ५ गडी बाद केले. यासह ती लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ५ गडी बाद करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
या डावात गोलंदाजी करताना तिने टॅमी ब्युमाँटला २ मिया बाऊचरला २३, एलिस कॅप्सीला ९, सकाळच्या सत्रात बाद केलं. त्यानंतर लंच झाल्यानंतर तिने कर्णधार सिव्हर ब्रंटला ४४ धावांवर आणि लॉरेन बेलला ३ धावांवर बाद करत तिने ५ गडी बाद करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. यासह तिचं नावं इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं गेलं आहे.
यासह तिच्या नावे आणखी एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. क्रांती गौड ही भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ५ गडी बाद करणारी चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती स्मृती मानधनाने देखील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी केली होती. यासह ती लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करणारी पहिलीच फलंदाज ठरली होती. यासह कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावे देखील एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. हरमनप्रीत कौर ही लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये अर्धशतकी खेळी करणारी पहिलीच महिला कर्णधार ठरली.
