Kranti Gaud Gender Comments Controversy: India Victory Over Pakistan: भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये आशिया चषक २०२६ मधील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद करत नंतर ७ विकेट्सने सहज सामना जिंकला. भारताच्या फिरकी गोलंदाजीविरूद्ध पाकिस्तानचा संघ पूर्णपणे फेल ठरला. पण या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी चाहत्यांकडून भारताची गोलंदाज क्रांती गौड हिला लिंगभेदात्मक आणि आक्षेपार्ह कमेंट्सचा सामना करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे.
क्रांती गौडच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही प्रेक्षक क्रांती गौडच्या दिसण्यावरून अपमानास्पद वक्तव्य करताना ऐकू येत आहेत. यात क्रांती पुरुष असल्याचा दावा वारंवार करण्यात आल्याचंही ऐकायला मिळत आहे. मात्र, या व्हिडीओतील प्रेक्षक नेमके कोण होते याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ७ विकेट्सच्या दणदणीत विजयादरम्यान क्रांती गौडसह गैरवर्तन झाल्याचं समोर आलं आहे. शनिवारी झालेल्या महिला आशिया चषक टी-२० सामन्यात प्रेक्षकांकडून तिच्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडीओमुळे महिला खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीवर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सामन्यानंतर क्रांती गौडचं नाव आणि तिच्याविरोधात करण्यात आलेल्या कथित कमेंट्स हा चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. विशेषतः सोशल मीडिया आणि स्टेडियममध्ये महिला खेळाडूंच्या लिंगावरून किंवा त्यांच्या शारीरिक दिसण्यावरून केल्या जाणाऱ्या अपमानास्पद कमेंट्स ही क्रीडा क्षेत्रातील जुनी समस्या आहे. या व्हिडीओमध्ये चाहते सातत्याने भारताने मुलाला खेळवलं आहे, आता तुम्हीच बघा आणि सांगा हा मुलगा आहे की नाही, असं तिच्याबद्दल सातत्याने बोलताना ऐकू येत आहे.
क्रांती गौडशी संबंधित या व्हिडीओमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महिला खेळाडूंविरोधातील अशा प्रकारच्या कमेंट्स कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचं चाहते स्पष्टपणे सांगत आहेत.
फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकला पाकिस्तानचा संघ
मैदानावर भारतीय संघाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अवघ्या १८.१ षटकांत ५५ धावांवर गुंडाळला. ही पाकिस्तानची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली.
भारताच्या युवा फिरकीपटू श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. दोघींनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. श्री चरणीने चार षटकांत अवघ्या ७ धावा देत ३ विकेट्स, तर लेगस्पिनर प्रेमा रावतने ९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने २ विकेट्स घेतल्या, तर शफाली वर्मानेही एक विकेट आपल्या नावावर केली.
पाकिस्तानने सुरुवातीला आत्मविश्वासाने खेळत बिनबाद २७ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी सूत्रं हाती घेताच त्यांचा डाव अक्षरशः कोलमडला. भारतीय गोलंदाजांनी तब्बल ७८ डॉट बॉल्स टाकले आणि पाकिस्तानने अवघ्या ९ धावांत ६ विकेट्स गमावल्या. त्यामुळे २७ बाद ० अशी स्थिती असलेला पाकिस्तानचा संघ थेट ३६ बाद ६ असा अडचणीत सापडला.
