scorecardresearch

फ्रेंच खुली  टेनिस स्पर्धा : क्रेजिकोव्हा, ओसाकाचे आव्हान संपुष्टात ; श्वीऑनटेक,  झ्वेरेव्हची आगेकूच

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील क्रेजिकोव्हाने १९ वर्षीय डीआने पॅरीकडून ६-१, २-६, ३-६ असा पराभव पत्करला.

एपी, पॅरिस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला एकेरीत तीन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. जपानची चार ग्रँडस्लॅम विजेती नाओमी ओसाका, चेक प्रजासत्ताकची गतविजेती बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि स्पेनची गार्बिन मुगुरुझा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. परंतु पोलंडच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील इगा श्वीऑनटेकने दुसरी फेरी गाठली.

महिला एकेरीत अमेरिकेच्या अ‍ॅमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने ओसाकाला ७-५, ६-४ असे नमवले. ओसाकाला या सामन्यात अपेक्षित खेळ दाखवता आला नाही. फटक्यांवरील नियंत्रणाअभावी तिच्याकडून २९ चुका झाल्या. ओसाकाला या स्पर्धेचा तिसऱ्या फेरीचा अडथळा आतापर्यंत कधीही ओलांडता आलेला नाही.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील क्रेजिकोव्हाने १९ वर्षीय डीआने पॅरीकडून ६-१, २-६, ३-६ असा पराभव पत्करला. क्रेजिकोव्हाने पहिला सेट जिंकत सामन्याला चांगली सुरुवात केली. परंतु दोन तास, आठ मिनिटे चाललेल्या लढतीत तिचा निभाव लागला नाही. एस्टोनियाच्या काइया केनेपीने २०१६च्या हंगामातील विजेत्या मुगुरुझानेला २-६, ६-३, ६-४ असे नामोहरम केले. मुगुरुझाचे सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले.

अन्य लढतींमध्ये, श्वीऑनटेकने लेसिया त्सुरेंकोला ५४ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-२, ६-० असा सहज विजय मिळवला. श्वीऑनटेकच्या आक्रमक खेळासमोर त्सुरेंको निष्प्रभ ठरला. जर्मनीच्या आंद्रेआ पेटकोव्हिचने ओशेन डॉडिनला ६-४, ६-२ असे नमवले. अमेरिकेच्या १८ वर्षीय कोको गॉफने पात्रता फेरीद्वारे मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या कॅनडाच्या रेबेका मारिनोला ७-५, ६-० असे पराभूत केले. पुरुष एकेरीत स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्कराझने युआन इग्नेसियो लोंडेरोचा ६-४, ६-२ ,६-० असे सरळ सेटमध्ये पराभव केला, तर तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या आलेक्सांद्र झ्वेरेव्हने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनेरविरुद्ध ६-२, ६-४, ६-४ अशी सरशी साधली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Krejcikova naomi osaka loses in the first round of the 2022 french open zws

ताज्या बातम्या