Virat Kohli And Krunal Pandya Dance: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना गुजरातच्या होम ग्राऊंडवर पार पडला, पण विजयाचा गुलाल मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उधळला. अंतिम सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. १५६ धावांचा पाठलाग करताना विराटने नाबाद ७५ धावांची खेळी केली. तर शेवटी षटकार मारुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावून दिली. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. तर हॉटेलमध्ये परतल्यानंतर क्रृणाल पंड्या आणि विराट कोहलीने भन्नाट डान्स केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी १८ वर्ष वाट पाहावी लागली होती. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभूत करुन जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करुन जेतेपद राखलं आहे. आयपीएलमध्ये लागोपाठ २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जल्लोष तर होणारच होता.

विराट अन् क्रृणाल पंड्याचा भन्नाट डान्स

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर विराट कोहली आणि क्रृणाल पंड्या यांनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. खेळाडूंनी डान्स केला, ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं. दरम्यान ट्रॉफी घेऊन जेव्हा खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचले, त्यावेळी देखील खेळाडूंनी हॉटेलमध्ये डान्स करुन विजयाचा आनंद साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात क्रृणाल पंड्या ट्रॉफी घेऊन भांगडा डान्स करताना दिसून येत आहे. क्रृणाल डान्स करत असताना विराटचीही एन्ट्री झाली, त्यानंतर विराट आणि क्रृणाल दोघांनी मिळून भांगडा डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दमदार विजय

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर १५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी केली आणि ५ गडी राखून विजय मिळवून दिला.