आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौचा पराभव केला. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला. या विजयात मुंबईचा माजी खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने मोलाची भूमिका बजावली. गेल्या सामन्यात विजय थोडक्यात हुकला होता. पण या सामन्यात त्याने आणखी जोर लावला आणि अर्धशतकी खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलताना तो भावूक झाला.

कृणाल पंड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना केली. यादरम्यान त्याने मुंबईला अनेक सामने जिंकून दिले. आता मुंबईला पराभूत करण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “कायरन पोलार्ड माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मुंबई इंडियन्ससोबतची ती सहा वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम होती. मला आठवतंय, पंड्या बंधू आणि कायरन पोलार्ड आम्ही तिघे मुंबई इंडियन्सच्या इंजिनसारखे होतो. आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर अनेक सामने जिंकले.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “२०११ चा शेवटचा सामना अजूनही आठवतोय, जेव्हा आम्ही तिघांनी एकत्र एकमेकांचे हात धरले होते. आम्हाला जाणीव झाली होती की, कदाचित आम्ही शेवटच्या वेळी एकत्र खेळतोय. तो क्षण खूप भावनिक होता. तो मला नेहमी म्हणायचा, एका चांगल्या माणसाला तुम्ही जास्त काळ दाबून ठेवू शकत नाही.”

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी १६७ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हवी तशी सुरुवात करता आली नाही. विराट शून्यावर,बेथेल २७ धावांवर माघारी परतला. पण शेवटी कृणाल पंड्याने कहर केला. त्याने ४६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना, या धावा धावून पूर्ण केल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना २ गडी राखून जिंकला.