Krunal Pandya India T20 Comeback India vs Afghanistan: भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानकडे यजमानपद असून भारतातच हे सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ आपल्याच घरच्या मैदानावर पाहुणा असणार आहे. दिल्लीत खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेसाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण या मालिकेसाठी भारताच्या एका खेळाडूला ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुनरागमनाची संधी देण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेसाठी कृणाल पंड्या भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, अशी चर्चा आहे. हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे; त्याने आपला शेवटचा टी-२० सामना २०२१ मध्ये खेळला होता. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, निवड समिती त्याच्या नावाचा विचार करत असून, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रश्न असा आहे की, जर कृणाल टी-२० संघात परतला, तर कोणाच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार अशी चर्चा देखील सुरू आहे. कदाचित कृणालची निवड झाल्यास तो अक्षर पटेलची जागा घेऊ शकतो. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाज म्हणून अक्षर पटेलची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती; आयर्लंडविरुद्ध त्याने केलेली १५ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला केवळ चार बळी घेता आले. अशा खराब कामगिरीनंतर, निवडकर्ते आता कृणाल पंड्याला संधी देण्याचा विचार करत आहेत.
आयपीएल २०२६ मध्ये कृणाल पंड्याने उत्कृष्ट कामगिरी करत, आरसीबीला (RCB) सलग दुसरं विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या डावखऱ्या अष्टपैलू खेळाडूने ३७.६६ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आणि १४ बळी (विकेट्स) घेतले, तसेच प्रति षटक केवळ ८.४१ धावांचा ‘इकॉनॉमी रेट’ राखला. याव्यतिरिक्त, कृणाल एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडे सामन्याच्या सर्व टप्प्यांवर पॉवरप्लेपासून ते ‘डेथ ओव्हर्स’पर्यंत गोलंदाजी करण्याची अष्टपैलू क्षमता आहे; म्हणूनच निवडकर्ते त्याच्या निवडीचा विचार करत असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यादेखील फिट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलनंतर झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या मैदानाबाहेर असून सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता.
