Krunal Pandya Reaction: आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला भारतीय संघात स्थान दिलं जायचं. पण त्यानंतर काळ बदलला आणि आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंसाठी भारतीय संघाचं दार उघडू लागलं. पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तरीदेखील त्यांना भारतीय संघात स्थान दिलं गेलेलं नाही. येत्या काही दिवसात भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण अनुभवी अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याला वगळण्यात आलं आहे. दरम्यान भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रुणाल पंड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे.
क्रुणाल पंड्याची पोस्ट चर्चेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २ वेळा चॅम्पियन बनवण्यात क्रुणाल पंड्याने मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला विश्वास होता की, आगामी टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकतं. पण असं काहीच झालेलं नाही. निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रुणाल पंड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आणि ४ शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने आपल्या स्टोरीमध्ये, “होप इज स्टील अलाई्व्ह”, असं लिहिलं आहे. ही स्टोरी शेअर करून त्याने दाखवून दिलं आहे की, आता जरी संघात स्थान मिळालं नसलं तरीदेखील त्याने पुनरागमन करण्याची आशा सोडलेली नाही.
आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी
आयपीएल २०२६ स्पर्धेत क्रुणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील ९ डावात त्याने १४५.८० च्या दमदार स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २२६ धावा केल्या. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने १४ गडी देखील बाद केले. गेल्या हंगामातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चॅम्पियन बनवण्यात क्रुणाल पंड्याने मोलाची भूमिका बजावली होती. आता त्याचं भारतीय संघात पुनरागमन कधी होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघात स्थान न मिळण्यामागचं कारण काय?
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेची सुरुवात येत्या १३ सप्टेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे ३ अष्टपैलू खेळाडू असताना क्रुणाल पंड्याला संधी मिळणं जरा कठीण होतं. क्रृणाल २०२१ मध्ये आपला शेवटचा टी-२० सामना खेळताना दिसून आला होता.
