Krunal Pandya Bruises RCB vs MI: आयपीएल २०२६ चा ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने हा सामना २ गडी राखून जिंकला. या विजयामुळे आरसीबी १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. आरसीबीच्या या विजयात कृणाल पंड्या सर्वात मोठा हिरो ठरला. सामन्यानंतर कृणालने सोशल मीडियावर आपल्या दुखापतीच्या खुणेचा एक फोटो शेअर केला, जो वेगाने व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर, कृणालने सोशल मीडियावर आपल्या दुखापतीचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की, हे निशाण ज्या गोष्टीसाठी लढलो ती लढत योग्य असल्याचा पुरावा आहेत. कृणाल पंड्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७३ धावांची खेळ केली. ४६ चेंडूंमध्ये ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात त्याने मोलाचं योगदान दिलं.

फलंदाजी करताना कृणालला पायात बरेच क्रॅम्प येत होते, ज्यामुळे त्याला संपूर्ण खेळीभर वेदना होत होत्या. मात्र, वेदना होत असूनही तो मैदानावर टिकून राहिला आणि त्याने निर्णायक खेळी केली. या खेळीदरम्यान कृणालच्या शरीरावर काही ठिकाणी चेंडू लागले, पण तरीही तो संघासाठी मैदानावर पाय घट्ट रोवून उभा होता. या वेदनेनंतर कृणालने आपल्या दुखापतीचा एक फोटोही शेअर केला होता. कृणालच्या पोटाला या खेळीदरम्यान दोन वेळा चेंडू लागला, त्या चेंडूचा लाल रंगाचा मोठा वळ त्याच्या शरीरावर उठल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १६६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने ५७ धावांची दमदार खेळी केली, तर नमन धीरने ४७ धावांचं योगदान दिलं. मुंबई इंडियन्सची फलंदाजी फळी पहिल्या डावात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने संघ फक्त १६६ धावाच करू शकला. पण मुंबईच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करत आरसीबीला सहज विजय मिळवू दिला नाही.

Krunal Pandya Instagram Story
कृणाल पंड्याची इन्स्टाग्राम स्टोरी

१६८ धावांचं लक्ष्य शेवटच्या चेंडूवर ८ गडी गमावून पूर्ण झालं. कृणाल पंड्याने संघासाठी शानदार फलंदाजी करत ४६ चेंडूंमध्ये ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. कृणालने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. जेकब बेथेलनेही २७ धावांचे योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकात एक जोरदार षटकार मारला. त्यानंतर रसिक सलाम व भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर २ धावा जोडून आरसीबीला या हंगामातील सातवा विजय मिळवून दिला.