Krunal Pandya on Hardik Pandya: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सलग आयपीएलचं जेतेपद पटकावलं. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संघान सलग दोन जेतेपद पटकावलं. यामधील आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा अजून एक खेळाडू म्हणजे कृणाल पंड्या. कृणाल पंड्या व त्याचा लहान भाऊ हार्दिक पंड्या यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यादरम्यान आता आयपीएल जिंकल्यानंतर कृणाल पंड्याने त्यांच्या नात्याबाबत वक्तव्य केलं आहे.
आयपीएल आणि भारतीय संघाकडून खेळताना पंड्या बंधूंची मैदानावरील घट्ट केमिस्ट्री अनेकदा पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या मोसमात दोन्ही भावंडांचा एकत्र एकही व्हीडिओ आला नाही. याशिवाय सामन्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन करतानाही दोघेही दिसले नाहीत. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये फुट पडली असल्याची चर्चा होती. यादरम्यान आता त्याने त्यांच्या नात्याबाबत वक्तव्य केलं होतं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कृणाल म्हणाला, “आम्ही दोघेही एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे क्रिकेटमधील तांत्रिक आणि रणनीतिक बाबींवर आमच्यात कायम चर्चा होत असते. त्या चर्चा नेहमीच उपयुक्त आणि सकारात्मक असतात. आम्ही एकमेकांना अधिक चांगलं कसं बनवता येईल, याबाबत विचारांची देवाणघेवाण करतो. तुमचा भाऊही जर त्याच खेळाचा भाग असेल, तर एकमेकांना मदत करणं सोपं होतं आणि पंड्या कुटुंबात आता १० ट्रॉफी आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे.”
पंड्या ब्रदर्स यांच्या नावे आयपीएलमध्ये प्रत्येकी ५-५ आयपीएल ट्रॉफी आहेत. त्यामुळे पंड्या हाऊसमध्ये १० आयपीएल ट्रॉफीज आहेत. हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सच्या २०१५ मधील दुसऱ्या आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. तर कृणाल पंड्याने २०१६ मध्ये मुंबईकडून पदार्पण केलं. त्यानंतर पंड्या बंधूंनी मुंबई इंडियन्सच्या २०१७, २०१९ आणि २०२० मधील विजेतेपद मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२१ हंगामानंतर कृणाल आणखी एक वर्ष मुंबईत राहिला, तर हार्दिक नव्याने स्थापन झालेल्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनला. विशेष म्हणजे, त्याने गुजरातला त्यांच्या पहिल्याच हंगामात आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. यानंतरच्या हंगामातही हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये कर्णधार म्हणून परतला. मात्र, त्याचे पुनरागमन चाहत्यांना विशेष भावलं नाही. गेल्या हंगामात मुंबईने प्लेऑफ गाठली असली, तरी यंदा पाच वेळच्या विजेत्या संघाला गुणतालिकेत तळाच्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले. आता हार्दिककडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
