चेन्नई : ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिकसह चार बळी मिळवल्यानंतर पृथ्वी शॉने (४८ चेंडूंत ७७ धावा) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारत-अ संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघाचा चार गडी राखून पराभव केला. यासह भारत-अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड-अ संघाचा डाव ४७ षटकांत २१९ धावांवर आटोपला. जो कार्टरने ७२, तर रचिन रिवद्रने ६१ धावांचे योगदान दिले. कुलदीपने लोगन व्हॅन बिक (४), जॉ वॉकर (०) आणि जेकब डफी (०) यांना सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅट्ट्रिक साकारली. त्याने ५१ धावांत चार गडी बाद केले. त्याला राहुल चहर आणि रिषी धवन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सुरेख साथ केली. त्यानंतर पृथ्वीच्या तडाखेबंद खेळीमुळे भारत-अ संघाने २२० धावांचे लक्ष्य ३४ षटकांत सहा गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. पृथ्वीला ऋतुराज गायकवाड (३०), संजू सॅमसन (३७) यांची साथ मिळाली.