IND vs WI 1st ODI Kuldeep Yadav Player of the Match Statement Report: कुलदीप यादवला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यानंतर त्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ विकेट्स जिंकला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीने १३५ धावांची भागीदारी रचली होती. कुलदीप यादवने भारताला ब्रेकथ्रू मिळवून देत वेस्ट इंडिजच्या निम्म्या फळीला माघारी धाडलं. कुलदीपने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्याने तो सामनावीर ठरला. हा पुरस्कार घेताना कुलदीप काय म्हणाला पाहूया.
पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने संपूर्ण संघाचे कौतुक केलं. त्याने विराट कोहलीऐवजी कुलदीप यादवला या सामन्याचा खरा ‘गेम-चेंजर’ मानलं. गिलने नमूद केलं की, वेस्ट इंडिजने केलेल्या दमदार सुरुवातीमुळे ते ३४०-३५० धावांचा टप्पा गाठतील असं वाटत होतं, परंतु कुलदीपने चेंडूने सामन्याचं पारडं पूर्णपणे फिरवलं. त्याने २० व्या षटकात सलामीची जोडी तोडली आणि आपल्या १० षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ४० धावा देत चार महत्त्वपूर्ण बळी घेतले. गिलने आपली फलंदाजी, आपला स्ट्राईक रेट आणि विराट कोहलीच्या शानदार शतकाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले.
कुलदीप यादव विराट कोहलीबाबत नेमकं काय म्हणाला?
कुलदीपला सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर विचारण्यात आलं की, त्याला सामन्यात सर्वाधिक मज्जा कधी आली, यावर उत्तर देताना कुलदीप म्हणाला, “मला शुबमन आणि विराट भाईची फलंदाजी खूप आवडली. त्यांनी खूप खास खेळी केली. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना मला थोडं अवघडल्यासारखं वाटतंय, कारण विराट भाईने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती अप्रतिम होती.”
आपल्या गोलंदाजीबद्दल तो म्हणाला, “माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझा रिदम. खरं सांगायचं तर, मी खूप शांत होतो आणि मला जशी गोलंदाजी करायची होती, तसंच करण्याचा प्रयत्न करत होतो. वेगात बदल, विविधता आणि फलंदाज माझ्या गोलंदाजीवर कोणत्या दिशेने फटका खेळेल, हे ओळखणं, या सगळ्या गोष्टी मला खूप चांगल्या जमल्या. माा रिदम खूपच चांगली होती.”
संघातून आत-बाहेर होत राहिल्यानंतरच्या या कामगिरीबाबत तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजीचा आनंद घेता, तेव्हाच तुमची सर्वोत्तम कामगिरी होते. तुम्ही रिलॅक्स असता आणि गोलंदाजीचा आनंद घेत असता, तेव्हा तुमची कामगिरीही सर्वोच्च पातळीवर होते. कधी कधी आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अशा एखाद्या चांगल्या स्पेलची गरज असते. यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो.”
“स्पिनर म्हणून अजूनही खूप सुधारणा करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. सगळं तुमच्या रिदम आणि फ्लोवर अवलंबून असतं. जेव्हा चांगल्या लयीत गोलंदाजी करता, तेव्हा सगळ्या गोष्टी सहज घडताना दिसतात. मला अजून सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे आणि मी हाच रिदम कायम ठेवणार आहे. कोणताही फॉरमॅट असो, तुमच्या रिदम आणि फ्लोमध्ये असणं सर्वात महत्त्वाचं आहे.”
