India vs West Indies 2nd ODI, Kuldeep Yadav Record: गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन करत तुफान फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजकडूनप पहिल्या डावात फलंदाजी करताना ३ फलंदाजांनी शतकं झळकावली. या फलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ४०० धावांचा पल्ला गाठला. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने २ महत्वपूर्ण गडी बाद केले. यादरम्यान त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

कुलदीप यादवने या डावात २ गडी बाद करताच वनडे क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. कुलदीप यादवने अवघ्या १२३ वनडे सामन्यांमध्ये २०० गडी बाद केले आहेत. यासह तो भारतासाठी खेळताना सर्वात जलद २०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सर्वात जलद २०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी अव्वल स्थानी आहे. शमीने अवघ्या १०४ सामन्यांमध्ये २०० गडी बाद केले होते. पण वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० गडी बाद करणाऱ्या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारतासाठी सर्वात जलद २०० गडी बाद करणारे गोलंदाज

मोहम्मद शमी- १०४ सामने
कुलदीप यादव- १२३ सामने
अजित आगरकर- १३३ सामने
जहीर खान- १४४ सामने
अनिल कुंबळ/जवागल श्रीनाथ- १४७ सामने

सर्वात कमी चेंडूंमध्ये २०० गडी बाद करणारे गोलंदाज

सकलेन मुश्ताक – ५४५१ चेंडूंमध्ये
राशिद खान- ५७८२ चेंडूंमध्ये
कुलदीप यादव- ६३१९ चेंडूंमध्ये
अॅडम झाम्पा- ६३८५ चेंडूंमध्ये
आदील राशिद- ६८८१ चेंडूंमध्ये
शेन वॉर्न- ६९८३ चेंडूंमध्ये

वेस्ट इंडिजने उभारला ४०५ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेलने १०१ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर कर्णधार शे होपने १०४ आणि आमीर जंगूने ११४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने ५० षटकांअखेर ७ गडी बाद ४०५ धावा केल्या.