Kuldeep Yadav Record IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांचीमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने १७ धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर कुलदीप यादवने आपल्या उत्कृष्ट फिरकीच्या गोलंदाजीवर सामना भारताच्या बाजूने फिरवला. कुलदीपने ४ विकेट्स घेत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

भारतीय संघाने विराट कोहलीचं शतक व रोहित-विराटच्या १३६ धावांच्या भागीदारीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेच्या संघाने रांचीमधील परिस्थितीचा फायदा घेत वेगाने धावा केल्या. मॅथ्यू ब्रिट्झके व मार्काे यान्सन यांनी ९७ धावांची भागीदारी रचली होती आणि सामना हळूहळू भारतापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांनाही कुलदीपने माघारी धाडलं.

कुलदीप यादवने फक्त ३ चेंडूत ब्रिट्झके आणि यान्सनला बाद केलं आणि सामना पालटला. या सामन्यात कुलदीप यादवने १० षटकांत ६८ धावा देत ४ बळी घेतले आणि तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या चार बळींसह कुलदीपने शेन वॉर्न, अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड सारख्या महान गोलंदाजांनाही मागे टाकलं.

कुलदीप यादवने वनडेमध्ये केला मोठा विक्रम

कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीत चौथ्यांदा ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी, त्याने २०१८ मध्ये केपटाऊन आणि गकेर्भा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या आणि २०२२ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिरकी गोलंदाजाने केलेला हा सर्वाेत्कृष्ट विक्रम आहे, कारण कुलदीपने शेन वॉर्न आणि युजवेंद्र चहल यांच्याशी बरोबरी केलेला विश्वविक्रम आता मोडला आहे. शेन वॉर्नने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन वेळा ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता आणि आता कुलदीपने त्याला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं.

वेगवान गोलंदाजांमध्ये, कुलदीप आता लसिथ मलिंगाच्या बरोबरीने आहे आणि केवळ ब्रेट ली आणि वकार युनूस त्याच्या पुढे आहेत. कुलदीपने एकत्र जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, युजवेंद्र चहल, डॅरेन गॉफ, पॉल रफेल आणि शेन वॉर्न यांना मागे टाकलं, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात तीन वेळा ४ बळी घेतले होते. इतकंच नाही तर कुलदीपने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत दहाव्यांदा एका सामन्यात चार बळी घेण्याची कामगिरी केली.