Kuldeep Yadav IND vs SA: भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेला आज १४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेत कुलदीप यादव संघाचा भाग आहे. तर वनडे सामन्यात व टी-२० विश्वचषकाचा विचार करता कुलदीप या दोन्ही मालिकांमध्ये खेळण्याची शक्यता आहे, पण यादरम्यान त्याने कसोटी संघातून रिलीज करावं असा बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
चायनामग गोलंदाज कुलदीप यादव भारतीय संघाचा नंबर वन फिरकीपटू आहे. कुलदीपने अनेक सामन्यांमध्ये मॅचविनिंग गोलंदाजी करत सामन्याचा रोख बदलला आहे. इंग्लंड दौऱ्यावर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्यानंतर त्याने पुनरागमन करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. यासह दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यांमध्ये कुलदीपची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत कुलदीप यादव प्लेईंग इलेव्हनचा भाग आहे. कुलदीपने या सामन्यात दोन विकेट्स घेत भारताला सामन्यात कायम ठेवलं. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताला दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. यादरम्यान कुलदीपने सुट्टीसाठी बीसीसीआयने अर्ज केला आहे.
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे संघातून रिलीज करण्याची मागणी का केली?
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे सुट्टी मिळावी अशी विनंती केली आहे. या महिन्याच्या अखेरीस कुलदीप यादव लग्न करणार असून याकरता त्याने सुट्टीसाठी अर्ज केला आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 नियोजित तारखेपेक्षा उशिरा संपल्यामुळे त्याचं लग्न पुढे ढकलावं लागलं होतं.
रिपोर्टनुसार, कुलदीपने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यासाठी सुट्टीची विनंती केली आहे. भारत २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे, तर दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरला रांचीमधून सुरूवात होणार आहे. कुलदीपच्या सुट्टीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाबरोबर साखरपुडा केला आहे, जी एलआयसीमध्ये काम करते. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुलदीप यादवने देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता. तर रिंकू सिंग व त्याची होणारी पत्नीदेखील कुलदीपच्या साखरपुड्याला पोहोचले होते.
