T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६चे जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू विजयाचा आनंद साजरा करत आहे. एकीकडे टी-२० वर्ल्डकप विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना आता टीम इंडियाचा खेळाडू लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. टी-२० विश्वचषकानंतर आता सर्व खेळाडू आयपीएलकरता आपआपल्या संघात सामील होणार आहेत. यापूर्वीच हा खेळाडू त्याच्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे.
भारतीय संघातील चायनामन गोलंदाज कुलदीप यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्न खरतर नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होतं, परंतु भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. पण, लग्नाची तयारी आता जोरात सुरू आहे. कुलदीपचा साखरपुडा गेल्यावर्षी ४ जून २०२५ ला झाला होता.
कुलदीप यादव त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी लग्न करणार आहे. लग्नाची तारीख १४ मार्च २०२६ आहे आणि हा लग्नसोहळा उत्तराखंडमधील मसूरी या ठिकाणी होणार आहे. वृत्तानुसार, लग्नापूर्वी १३ मार्च रोजी हळद आणि मेहंदीचे समारंभ होतील. लग्नाच्या तीन दिवसांनंतर, १७ मार्च रोजी, लखनौमधील हॉटेल सेंट्रम येथे एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाईल. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू, बॉलिवूड स्टार आणि उत्तर प्रदेशमधील प्रमुख राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोण आहे कुलदीप यादवची होणारी पत्नी?
कुलदीप यादवची भावी पत्नी, वंशिका, कानपूरमधील श्याम नगरची रहिवासी आहे. ती एलआयसीमध्ये काम करते. कुलदीप आणि वंशिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि त्यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झाला. त्यांचा साखरपुडा ४ जून २०२५ रोजी लखनऊमध्ये एका खाजगी समारंभात झाला. कुलदीप यादवच्या लग्नाचं आमंत्रण लखनौचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही देण्यात आलं आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात कुलदीप यादवला सामना खेळण्याची फक्त एकच संधी मिळाली. त्याला फक्त एकाच सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. पण, तो सर्वात मोठा सामना होता. कारण त्याला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने १४ धावा देऊन एक विकेट घेतली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
