Kuldeep Yadav Vanshika Mehendi Ceremony Viral Video: टी-२० विश्वचषक २०२६ नंतर भारताचा क्रिकेटपटू कुलदीप यादव लग्नबंधनात अडकणार आहे. कुलदीप त्याची बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्याबरोबर लग्न करणार आहे. कुलदीप यादवच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. येत्या १४ मार्चला मसुरीमध्ये कुलदीप व वंशिका लग्नगाठ बांधणार आहे. सध्या त्यांच्या मेहंदी सोहळ्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
कुलदीप यादव आणि त्याची होणारी पत्नी वंशिका यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो-व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निसर्गरम्य डोंगराळ पर्यटनस्थळ असलेल्या मसुरीमध्ये सॅवॉय हॉटेलमध्ये कुलदीप यादवचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. भारतीय संघाने ८ मार्चला टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद पटकावलं. कुलदीप यादव भारताच्या या वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. आधी अशी चर्चा होती की लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये होईल, परंतु भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे ते पुढे ढकलण्यात आले.
कुलदीप यादव व वंशिका मेहंदी सोहळ्याकरता स्टेजवर बसलेले दिसत आहेत. कुलदीपने मेहंदीसाठी हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर वंशिकाने सुंदर ड्रेस घातला आहे. मेहंदीच्या या व्हीडिओदरम्यान वंशिका डान्स करतानाही दिसत आहे. दोघांचे कुटुंबिय, मित्र परिवार त्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. कुलदीपच्या मेहंदीनंतर आजच हळदी समारंभ पार पडेल आणि १४ मार्च म्हणजे उद्या दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. यानंतर १७ मार्चला भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, कुलदीप यादवचं लग्न त्याच्यासाठी आनंद द्विगुणित करणार असेल. कुलदीप त्याच्या लग्नासाठी डेहराडूनमध्ये पोहोचला होता, जिथे त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. लग्नासाठी डेहराडूनमध्ये पोहोचलेल्या कुलदीप यादवचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो नाचताना दिसत आहे.
कोण आहे कुलदीप यादवची होणारी पत्नी?
कुलदीप त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत लग्न करणार आहे. लग्नाची तारीख १४ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. वृत्तानुसार, लग्नाच्या आधी १३ मार्च रोजी हळदी आणि मेहंदी समारंभ होतील. तीन दिवसांनी, १७ मार्च रोजी लखनौमधील हॉटेल सेंट्रममध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केला जाईल. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू, बॉलिवूड स्टार आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख राजकारणी या रिसेप्शनला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. कुलदीपचे वडील राम सिंह यादव यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखनौ येथे होणाऱ्या लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.
