Kuldeep Yadav Wedding 1st Pic Out: टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर आता कुलदीप यादव लग्नबंधनात अडकला आहे. कुलदीपच्या लग्नाचा पहिला व्हीडिओ समोर आला आहे. कुलदीपने त्याच्या बालपणीची मैत्रिण वंशिका चड्डा हिच्याशी विवाह केला आहे. कुलदीप यादवने मसुरीमध्ये एकदम रॉयल पद्धतीने लग्न केलं आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील सवॉय हॉटेलमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला आहे.
कुलदीपने क्रिम कलरचा आऊटफिट तर पत्नी वंशिका हिने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्या दोघांच्या रॉयल वेडिंग एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कुलदीप यादवच्या या शाही एन्ट्रीसाठी खाली फॉग होता, तर दोन्ही बाजूला खास दिवे, फुलांची आरास करण्यात आली होती. सवॉय हॉटेलच्या पायऱ्या उतरत येतानाचा कुलदीप-वंशिकाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.’
कुलदीप यादवच्या लग्नासोहळ्याचा पहिला फोटो आला समोर
भारतीय संघातील अनेक आजी माजी खेळाडू कुलदीपच्या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. सध्या रिंकू सिंह व त्याची पत्नी, त्यानंतर युजवेंद्र चहल, तिलक वर्मा व नितीश राणा हे खेळाडू पोहोचले आहेत. याशिवाय टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधील टी दिलीपदेखील या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. तर माजी खेळाडू भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना व मोहम्मद कैफदेखील हजर राहिले आहेत.
कुलदीप यादवच्या लग्नासाठी बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्णा शास्त्रीदेखील लग्नसोहळ्यात सामील झाले आहेत. आज १४ मार्चला लग्नसोहळ्यापूर्वी १३ मार्चला त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली होती. मेहंदी व हळदी समारंभातील व्हीडिओदेखील व्हायरल झाले होते. कुलदीप व वंशिकाचं लग्न डिसेंबर २०२५ मध्ये लग्नबंधनात अडकणार होते. पण टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक असल्याने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. आता कुलदीप वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याने लग्नगाठ बांधली आहे.
कुलदीप आणि वंशिकाच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि टीम इंडियाचे चाहते या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुलदीप आणि वंशिकाचे गेल्या वर्षी ४ जून रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर क्रिकेट जगतातील नवं जोडपं समोर आलं. दोघेही कानपूरचे आहेत आणि लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.
