Kuldeep Yadav Haldi Ceremony Video: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव लग्नबंधनात अडकणार आहे. कुलदीप त्याच्या बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्याबरोबर आज १४ मार्चला लग्नगाठ बांधेल. मसुरीमधील हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाआधीचे विधी पार पडत आहेत. आपल्या लाडक्या मित्राच्या लग्नासाठी युझवेंद्र चहलदेखील पोहोचला आहे. चहलने कुलदीपच्या हळदीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.

कुलदीपचे काही भारतीय संघातील मित्र लग्नाच्या विविध विधींमध्ये सहभागी होत आहेत. युजवेंद्र चहल आणि रिंकू सिंह यांच्यासह अनेक जण कुलदीपच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. शुक्रवारी हळदी समारंभात चहलची मस्ती पाहायला मिळाली. त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. यादरम्यान टीम इंडियामधील ‘कुल-चा’चं बॉन्डिंगदेखील पाहायला मिळालं.

कुलदीप यादवच्या हळदीला पोहोचले टीम इंडियातील खेळाडू

व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल कुलदीपला हळद लावताना दिसत आहे. कुलदीपला हळद लावल्यानंतर तो कुलदीपच्या पायांना स्पर्श करतो आणि नंतर कुलदीपसोबत फोटो काढतो. कुलदीप पण चहलबरोबर मस्ती करण्यात मागे हटत नाही, तो आपल्या गालाची हळद चहलला लावतो. त्यानंतर चहल कुलदीपची होणारी पत्नी वंशिकालादेखील हळद लावतो. एवढचं नव्हे तर कुलदीपच्या हळदीला नाचतानाचे त्याचे व्हीडिओ समोर आले आहेत.

२०२० पूर्वी, एक काळ असा होता जेव्हा कुलदीप आणि चहलच्या जोडीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा होता. दोघेही टीम इंडियासाठी मॅचविनर होते. त्यांची फिरकी जोडी “कुलचा” म्हणून ओळखली जात असे. २०१९ च्या इंग्लंडमधील विश्वचषकादरम्यान कुलदीप आणि चहलची ही जोडी तुटली. तेव्हापासून ते क्वचितच भारतासाठी एकत्र खेळले आहेत. दोघेही संघाबाहेर होते आणि परतले आहेत. चहलला त्याचं स्थान राखण्यात अपयश आलं. त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. दुसरीकडे, कुलदीप सातत्याने तिन्ही संघांचा भाग राहिला आहे. तो २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याने फक्त एकच सामना खेळला.

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय संघाचे खेळाडू २०२६ मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे, तर युजवेंद्र चहल पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २०० पेक्षा जास्त विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. कुलदीपने १०२ विकेट घेतल्या आहेत.