Kumar Sangakkara alleges mistreatment by Ryanair staff Dublin Airport: श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा याला आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे ‘रायनएअर’ (Ryanair) एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, विमान कंपनीच्या गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी भेदभावपूर्ण आणि धमकी देत गैरवर्तन केलं. संगकाराने या घटनेला पहिलाच नकारात्मक अनुभव असल्याचंही त्याने म्हटलं.

कुमार संगकारासह डब्लिनच्या एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

संगकाराने बुधवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये आपला कटू अनुभव मांडला. त्याने लिहिलं, “डब्लिनमध्ये Ryanair च्या बोर्डिंग गेटवरील कर्मचाऱ्यांकडून कोणाला भेदभावपूर्ण वागणुकीचा अनुभव आला आहे का? मला आणि माझ्या कुटुंबाला नुकताच असा अनुभव आला आणि तो अत्यंत धक्कादायक होता. बोलण्याची पद्धत, प्रक्रियेतील गोंधळ आणि धमकी दिल्यासारखं वर्तन या गोष्टी अजिबात स्वीकारार्ह नाहीत. कोणत्याही प्रवाशासोबत असं वर्तन होणं चुकीचं आहे. डब्लिनमध्ये आलेला हा माझा पहिलाच वाईट अनुभव आहे.”

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी विमान कंपनीच्या अव्यावसायिक वर्तनावर टीका केली. प्रसिद्ध पत्रकार पियर्स मॉर्गन यांनीही कुमार संगकाराला पाठिंबा दिला. संगकारा हा अत्यंत सभ्य आणि सन्मानपूर्वक वागणारा व्यक्ती असल्याचं सांगत, त्याला विमान कंपनीविरोधात जाहीरपणे बोलावं लागलं, यावरून कर्मचाऱ्यांचं वर्तन किती लज्जास्पद असावे, अशी प्रतिक्रिया मॉर्गन यांनी दिली. तसेच, रायनएअरने या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

रायनएअर ही आयर्लंडमधील अत्यल्प दरात विमानसेवा देणारी कंपनी आहे. तिचे मुख्यालय आयर्लंडमधील काउंटी डब्लिन येथील स्वॉर्ड्समध्ये आहे. नियोजित प्रवासी संख्या, विमानांच्या ताफ्याचा आकार आणि एकूण उड्डाणे या निकषांवर रायनएअर ही युरोपमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे.

कुमार संगकारा इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. २०२६ च्या हंगामापूर्वी त्यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. याआधी २०२१ ते २०२४ यादरम्यान त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती, त्यानंतर २०२४ मध्ये त्यांची ‘डिरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राहुल द्रविड यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. संगकारा यांच्या मार्गदर्शनाखाली, राजस्थान रॉयल्स १७ वर्षांत पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होती, मात्र त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला.