Kumar Sangakkara Irfan Pathan Sledging Controversy Delhi Test: कुमार संगकारा म्हटलं की डोळ्यांसमोर नेहमी शांत, संयमी असा खेळाडू चेहऱ्यासमोर उभा राहतो. मैदानावर गोलंदाजांची शाळा घेत मोठी खेळी करण्यात हातखंडा असणाऱ्या कुमार संगकाराने कारकीर्दीत खोऱ्याने धावा केल्या आहेत. खेळताना मैदानावर भावनांवर नियंत्रण ठेवणारा खेळाडू दिसतो. मात्र श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने एकदा भारतीय संघावर फसवणुकीचा आरोप करत स्लेजिंग केल्याचा प्रसंग घडला होता.
भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने या प्रसंगाची आठवण करून दिली. २००५ मध्ये श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान दिल्लीत भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात ही घटना घडली होती. भारताचा संघ श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इरफान पठाण आणि गौतम गंभीर यांनी डावाची सुरुवात केली होती.
त्या सामन्यात इरफान पठाणने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, पण त्याच्या या उत्कृष्ट खेळीपेक्षा त्याचा आणि कुमार संगकाराचा झालेला शाब्दिक वाद अधिक चर्चेत राहिला. पठाणने पुढे सांगितलं की, श्रीलंकेच्या डावादरम्यान पंचांनी चेंडू बदलल्यानंतर पाहुण्या संघात नाराजी होती. भारत फलंदाजीला आल्यानंतर कुमार संगकाराने थेट इरफान पठाणला सामोरं जात भारतीय संघ फसवणूक करत असल्याचा आरोप केला. इतकंच नाही, तर भारतीय खेळाडूंच्या संस्कारांवरही त्याने टोला लगावला.
मुथय्या मुरलीधरनला पठाणने सलग दोन षटकार लगावल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. संगकाराचा संताप वाढला, पण पठाणनेही त्याला लगेचच प्रत्युत्तर दिलं.
इरफान पठाण आणि संगकारामध्ये कशावरून वाद झाला होता?
जिओहॉटस्टारच्या ‘Cheeky Singles’ कार्यक्रमात इरफान पठाण किस्सा सांगताना म्हणाला, “दिल्ली दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना खेळवला गेला होता. मी डावाची सुरुवात केली आणि ९३ धावा केल्या. पहिल्या डावानंतर आम्ही गोलंदाजीला उतरलो तेव्हा चेंडूंचा बॉक्स बदलला गेला किंवा असं काहीतरी झालं होतं आणि श्रीलंकन खेळाडू नाराज होते. त्यात संगकारा सर्वात जास्त बोलत होता. नंतर मी फलंदाजीला गेलो तेव्हा नेमकं काय झालं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती; मला फक्त ओपनिंगसाठी पाठवलं गेलं होतं. मी मुरलीधरनच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचले.”
पठाण पुढे म्हणाला, “जर नवीन चेंडूवर एखादा गोलंदाज षटकार खात असेल, तर याचा अर्थ तुम्ही विरोधी संघाचं नियोजन थोडं बिघडवलं आहे. अचानक संगकारा म्हणू लागला, ‘तुम्ही लोक चीटिंग करता, तुमचे आई-वडीलही तुम्हाला हेच शिकवतात’ वगैरे. त्याने वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलायला सुरुवात केली आणि मीही त्याला प्रत्युत्तर दिलं. सुरुवात त्यानेच केली होती.”
पठाण आणि संगकारामधील वाद कसा मिटला?
काही वर्षांनंतर कुमार संगकारा आणि इरफान पठाण किंग्स इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्स) संघात एकत्र आले. त्या वेळी दोघांनी जुना वाद मागे टाकत संबंध सुधारल्याचा खुलासा पठाणने केला.
“लिलावानंतर मला कळलं की मी पंजाबमध्ये संगकाराबरोबर खेळणार आहे. आता मी त्याच्या कुटुंबासोबत बसून जेवत होतो आणि मला काय करावं हेच समजत नव्हतं. मी त्याच्याकडे जाऊन माफी मागितली. त्यानेही माफी मागितली आणि त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. सामन्यात भावना तीव्र असतात आणि चुका होतात. पण त्या किती परिपक्वतेने हाताळता, हे महत्त्वाचं असतं,” असं इरफानने पुढे सांगितलं. सध्या कुमार संगकारा आयपीएलमधील एक महत्त्वाचा चेहरा आहे आणि तो राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
