Kumar Sangakkara on Vaibhav Sooryavanshi: अंडर-१९ क्रिकेट व आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आता वैभव सूर्यवंशी लवकरच भारतीय संघात पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी, त्याच्या अनुपस्थितीची चर्चा कायम होती. आता दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. दरम्यान कुमार संगकाराने वैभव सूर्यवंशीबरोबरची त्याची पहिली भेट आणि पहिल्या भेटीत वैभवने या दिग्गज खेळाडूला कसं प्रभावित केलं होतं, हे स्वत: स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराने वैभव सूर्यवंशीबाबतचा एक खास अनुभव सांगितला आहे. हा प्रसंग गेल्या वर्षीच्या आयपीएलपूर्वीचा आहे. त्यावेळी संगकारा राजस्थान रॉयल्स संघाचा क्रिकेट संचालक होता, तर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. याच काळात संगकाराने पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशीची फलंदाजी जवळून पाहिली.

नेट्समध्ये सूर्यवंशीने केलेली फलंदाजी पाहून संगकारा अक्षरशः थक्क झाला. विशेष म्हणजे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्याविरुद्ध सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि निडर फलंदाजीने उपस्थित सर्वांनाच प्रभावित केलं होतं.

“मी पहिल्यांदा वैभव सूर्यवंशीला गुवाहाटीमध्ये दोन आठवड्यांच्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान पाहिलं. मैदानाच्या एका बाजूला छोटंसं नेट होतं, जिथे जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि इतर वेगवान गोलंदाज नव्या चेंडूने गोलंदाजी करत होते. त्या नेटमध्ये फलंदाजी करायला फारसं कुणी धजावत नव्हतं. तेवढ्यात वैभव आला आणि म्हणाला, ‘मी फलंदाजी करतो.’

“नव्या चेंडूसमोर तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून मी थक्क झालो. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका बंदुकीच्या गोळीच्या आवाजासारखा वाटत होता. त्याने जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अक्षरशः वर्चस्व गाजवलं. एका क्षणी तर मला आठवतं, आर्चर गोलंदाजी थांबवून हसू लागला. कारण तो पूर्ण वेगाने गोलंदाजी करत होता आणि समोरचा अवघ्या १४ वर्षांचा मुलगा त्याच्या गोलंदाजीला अजिबात न जुमानता सहज फटके मारत होता,” असं सध्या राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या कुमार संगकाराने सांगितलं.

वैभव सूर्यवंशीची वादळी फटकेबाजी पाहिल्यानंतर कुमार संगकाराने द्रविडला काय सांगितलं होतं?

कुमार संगकाराने त्या दिवसानंतर राहुल द्रविडला काय सांगितलं, याचाही खुलासा केला. “त्या दिवशी त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर मी राहुल द्रविडला फक्त एकच गोष्ट सांगितली होती, ‘जेव्हा संधी मिळेल तेव्हा या मुलाला संघात खेळवा. तो पूर्णपणे तयार आहे. हा मुलगा खरोखरच अफलातून आहे,'” असे संगकारा म्हणाला. वैभवच्या फलंदाजीतील आत्मविश्वास, निर्भीड वृत्ती आणि नैसर्गिक प्रतिभेने आपण तेव्हाच प्रभावित झालो होतो, असंही संगकाराने सांगितलं.