गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या कुमार संगकाराला उपस्थित क्रिकेटरसिकांनी भावनिक निरोप दिला. १५ वर्षांपूर्वी याच मैदानावर संगकाराने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. श्रीलंकेच्या संघाने धक्कादायक विजय मिळवीत संगकाराच्या कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी संस्मरणीय ठरवली. संगकाराने या कसोटीत अनुक्रमे ५ आणि ४० धावांचे योगदान दिले. परंतु थरिंदू कौशलने अमित मिश्राला तंबूची वाट दाखवून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, तेव्हा संगकाराच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याने धावत जाऊन या विजयाचा अध्याय लिहिणाऱ्या दिनेश चंडिमल आणि रंगना हेराथ यांना मिठी मारली. मग कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचे अभिनंदन केले. संगकारा इतका भावनिक झाल्याचे प्रथमच दिसून आले. स्टेडियममध्ये संगकाराचे संपूर्ण कुटुंब हा सामना पाहायला उपस्थित होते.
सामन्याच्या निकालाने धक्कादायक कलाटणी दिली. अभिमानास्पद प्रयत्न. मला शब्दच सुचत नाही. पहिल्या डावात आमची फलंदाजी खराब झाली; परंतु आम्ही शरणागती पत्करली नाही. चंडिमलने एकहाती किल्ला लढवला आणि आम्ही समाधानकारक धावसंख्या उभारू शकलो. खेळपट्टी आव्हानात्मक होती, त्यामुळे साडेतीन दिवसांत दोन्ही संघ दोनदा गारद झाले. आमच्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. चेंडू वळत असल्यामुळे भारतानेही तीन फिरकी गोलंदाज खेळवले; परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून खेळल्याने विजय मिळवता आला.
– अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार
कोणालाही जबाबदार धरण्यापेक्षा आम्ही स्वत:च या पराभवाला जबाबदार आहोत. मॅथ्यूज आणि त्याच्या संघाला या विजयाचे श्रेय द्यायला हवे. दुसऱ्या डावात श्रीलंकेचे पाच बळी मिळवल्यानंतर सामन्यावर नियंत्रण मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो. याच सत्रात सामना संपवण्याची आम्हाला संधी होती; परंतु एका वाईट सत्रामुळे सामन्याचा निकाल पालटू शकतो, हेच कसोटी क्रिकेटने पुन्हा एकदा सिद्ध केले. चंडिमलच्या फलंदाजीने श्रीलंकेचा पराभव टळला. रंगना हेराथ हा लाजवाब गोलंदाज आहे. त्याने भारतीय फलंदाजांना झगडायला लावले.
– विराट कोहली, भारताचा कर्णधार
फलंदाजी करण्यासाठी ही खेळपट्टी नक्कीच अनुकूल नव्हती. मी स्वीप आणि रीव्हर्स स्वीपच्या फटक्यांचा प्रभावी वापर केला, की जेणेकरून गोलंदाजांवर दडपण येईल. याचप्रमाणे एकेरी धावांवर विशेष भर दिला. संगकारा, मॅथ्यूज, थिरिमाने आणि मुबारक यांच्या फलंदाजीचेही विजयात मोलाचे योगदान आहे. १७५ हून अधिक धावा दुसऱ्या डावात आव्हानात्मक ठरू शकतील, असे मला वाटत होते. हेराथचे मोठेपण आम्ही सर्वच जण जाणतो. त्याने आपली भूमिका उत्तम साकारली.
– दिनेश चंडिमल, श्रीलंकेचा फलंदाज

धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : १८३.
भारत (पहिला डाव) : ३७५.
श्रीलंका (दुसरा डाव) : ३६७.
भारत (दुसरा डाव) : लोकेश राहुल पायचीत गो. हेराथ ५, शिखर धवन झे. आणि गो. कौशल २८, इशांत शर्मा पायचीत गो. हेराथ १०, रोहित शर्मा त्रि. गो. हेराथ ४, विराट कोहली झे. सिल्व्हा गो. कौशल ३, अजिंक्य रहाणे झे. मॅथ्यूज गो. हेराथ ३६, वृद्धिमान साहा यष्टिचीत चंडिमल गो. हेराथ २, हरभजन सिंग झे. सिल्व्हा गो. हेराथ १, रविचंद्रन अश्विन झे. प्रसाद गो. हेराथ ३, अमित मिश्रा झे. करुणारत्ने गो. कौशल १५, वरुण आरोन नाबाद १, अवांतर (लेगबाइज २, वाइड १, नोबॉल १) ४, एकूण ४९.५ षटकांत सर्व बाद ११२.

बाद क्रम : १-१२, २-३०, ३-३४, ४-४५, ५-६०, ६-६५, ७-६७, ८-८१, ९-१०२, १०-११२.

गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-२-४-०, रंगना हेराथ २१-६-४८-७, थिरदू कौशल १७.५-१-४७-३, नुवान प्रदीप ६-३-८-०, अँजेलो मॅथ्यूज १-०-३-०.

सामनावीर : दिनेश चंडिमल.