Kyle Jemieson Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १ मे रोजी आयपीएलमधील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २२५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात दिल्लीने पथुम निसांका व केएल राहुलच्या मॅचविनिंग भागीदारीच्या बळावर सहज सामना जिंकला. या सामन्यात लक्षवेधी चेहरा असलेला वैभव सूर्यवंशी मात्र फेल ठरला. पण या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीबरोबर पंगा घेतल्याचा फटका दिल्लीच्या खेळाडूला बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला आयपीएलकडून सक्त ताकीद आणि समज देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जेमिसनने गोलंदाजीने दिल्लीला चांगली सुरूनात करून दिली. त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर १५ वर्षीय आक्रमक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीला बाद करत माघारी धाडलं आणि त्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.
वैभव सूर्यवंशीने काईल जेमिसनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लाँग ऑफवरून चौकार लगावला. वैभवने आपल्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण जेमिसनच्या कमालीच्या यॉर्करचा अंदाज घेण्यात तो अपयशी ठरला आणि क्लीन बोल्ड होत बाद झाला. त्यानंतर जेमिसनने मोठ्याने गर्जना करत वैभवच्या दिशेने येत आक्रमकपणे जल्लोष केला. वैभव सूर्यवंशीच्या जवळ जाऊन केलेल्या या आक्रमक सेलिब्रेशनचा जेमिसनला चांगलाच फटका बसला आहे.
सामन्यानंतर, काईल जेमिसन आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला, त्याला सक्त ताकीद आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. काईल जेमिसनने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आपला गुन्हा कबूल केला आहे. आयपीएलने जारी केलेल्या एका निवेदनात, जेमिसनला आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. हे कलम एका खेळाडूच्या अशा कृती किंवा प्रतिक्रियेसंबंधी आहे, ज्यामुळे दुसरा खेळाडू संतापू शकतो.
जेमिसनने या प्रकरणात सामनाधिकारी राजीव सेठ यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे, या प्रकरणात पुढील सुनावणी होणार नाही. जेमिसनने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती, पण त्याला ती य कामगिरीत सातत्य ठेवता आलं नाही. आपल्या चार षटकांत जेमिसनने ४८ धावा दिल्या आणि केवळ एक बळी घेतला.
