फिफा विश्वचषकादरम्यान मैदानाबाहेरील आणखी एका वादाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे आणि पॅराग्वेच्या सिनेटर सेलेस्टे अमारिला यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगली आहे. फ्रान्सने २०२६ फिफा विश्वचषकाच्या राऊंड ऑफ-३२ सामन्यात पॅराग्वेचा निसटता पराभव केल्यानंतर हा वाद सुरू झाला. या वादामागचं नेमकं कारण काय आहे आणि सिनेटर सेलेस्टे अमारिला यांनी एम्बाप्पेने माफी मागावी असं का म्हटलंय, जाणून घेऊया.
अमारिला यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवर पत्र पोस्ट करत एम्बाप्पेवर टीका केली. त्यांनी एम्बाप्पेला “कॅमेरूनमधून आलेला वसाहतवादी मानसिकतेचा व्यक्ती, जो स्वतःला फ्रेंच असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो; अहंकारी आणि कुरूप” अशा शब्दांत त्याचा उल्लेख केला. त्यानंतर एम्बाप्पेने दिलेल्या प्रत्युत्तरावर आक्षेप घेत अमारिला यांनी त्याच्याकडे सार्वजनिक माफीची मागणी केली असून, आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.
एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये अमारिला यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा वाद फ्रान्स किंवा फ्रेंच राष्ट्रीय संघाशी नसून केवळ किलियन एम्बाप्पेशी आहे. फ्रान्सशी असलेल्या आपल्या दीर्घ आणि जिव्हाळ्याच्या नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. अमारिला यांनी लिहिलं, “हा वाद फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. मी कधीही फ्रान्सविरोधात काही बोलले नाही. उलट, मला त्या देशाबद्दल खूप आदर आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंत मी फ्रेंच शाळेत शिक्षण घेतलं. त्या शिक्षणामुळेच आज मी जे काही आहे ते घडू शकले.
त्या पुढे म्हणाल्या, आम्ही ‘ला मार्सेयेज’ हे फ्रान्सचं राष्ट्रगीत गायचो, त्यांच्या ध्वजालाही तितकाच सन्मान द्यायचो. मला फ्रेंच भाषा अवगत आहे आणि फ्रान्सला भेट देणंही आवडतं. गेल्या ख्रिसमसला मी कुटुंबासह कूर्शेव्हलमध्ये होते आणि नववर्षाचं स्वागत सेंट-ट्रोपेझमध्ये केलं. त्यामुळे माझा वाद फ्रान्सशी नाही, तर फक्त तुझ्याशी आहे.” याशिवाय, अमारिला यांनी एम्बाप्पेवर सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यान अहंकारी वर्तन केल्याचा आरोप केला. फ्रान्स-पॅराग्वे सामन्यात अनेक कठोर टॅकल्स आणि खेळाडूंमधील वादामुळे वातावरण तापलं होतं. विशेष म्हणजे, फ्रान्सने १-० असा विजय मिळवल्यानंतर एम्बाप्पेने पॅराग्वेच्या गोलरक्षकासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.
आपली टीका पुढे सुरू ठेवताना अमारिला यांनी पत्रात लिहिलं, “संपूर्ण सामन्यादरम्यान तुझा अहंकार स्पष्ट दिसत होता. तू प्रतिस्पर्धी प्रत्येक खेळाडूकडे तुच्छतेने पाहत होतास. इतकंच नव्हे, तर तोंडही न झाकता तू ‘La concha de tu madre’ असे शब्द उच्चारलेस. लॅटिन अमेरिकेत हे शब्द अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद मानला जातात आणि तुला हे चांगलेच माहीत आहे.” याशिवाय, सामन्यानंतर पॅराग्वेच्या गोलरक्षकाचा योग्य सन्मान न केल्याचाही आरोप त्यांनी एम्बाप्पेवर केला.
अमारिला पुढे म्हणाल्या, “सामना संपल्यानंतर तू आमच्या गोलरक्षकाचीही पर्वा केली नाहीस. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. विजय किंवा पराभव काहीही असो, प्रतिस्पर्ध्यांमधील परस्पर आदर हा जवळपास पवित्र मानला जातो. पण तू त्याच्याशी हस्तांदोलनही केलं नाहीस आणि त्याच्यासमोरच विजयाचा जल्लोष केलास. त्या एका क्षणात तू तुझा अहंकार, तुच्छतावृत्ती आणि असभ्यपणा दाखवून दिलास. यामुळे मला आणि संपूर्ण पॅराग्वेला मोठा धक्का बसला. फ्रान्स हा शतकानुशतके परंपरा आणि संस्कार जपणारा देश आहे. त्यामुळे तुझ्या वर्तनाची जबाबदारी फ्रान्सने निश्चितच घ्यायला हवी.”
आपल्या आधीच्या पोस्टमधील काही शब्दांचा पुनर्विचार केल्यानंतर ती पोस्ट आपण हटवल्याची कबुलीही अमारिला यांनी दिली. यानंतर अमारिला यांनी एम्बाप्पेकडेही त्याच्या वक्तव्याबद्दल माफीची मागणी केली. त्या म्हणाल्या, “आता मीही तुझ्याकडून तुझं वक्तव्य मागे घेण्याची आणि माझी माफी मागण्याची मागणी करते. तुझी आक्रमक भाषा मीही सहन करणार नाही. तू मला ओळखत नाहीस, मग मला ‘अयोग्य’ किंवा ‘तुच्छ’ महिला म्हणण्याचा तुला कोणताही अधिकार नाही. मी पॅराग्वेची लोकनियुक्त सिनेटर आहे. त्याआधीही मी लोकांनी निवडून दिलेली खासदार होते. हजारो नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं आहे. त्यांच्या आवाजाला न्याय देणं आणि माझ्या देशासाठी उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे.”
आपल्या पत्राच्या शेवटी अमारिला यांनी एमबाप्पेवर राजकीय आणि लिंगभेदावर आधारित हिंसक वर्तनाचा आरोप केला आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्या म्हणाल्या, “तू मला ओळखतही नाहीस, मग मला ‘अयोग्य’ किंवा ‘तुच्छ’ महिला म्हणणारा तू कोण? हे सरळसरळ महिलांविरोधातील हिंसक आणि अपमानास्पद वर्तन आहे. लोकांच्या मतांनी निवडून आलेल्या एका महिला प्रतिनिधीचा तू अपमान केला आहेस. वक्तव्य मागे घे आणि फ्रान्सचा नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारत माझी माफी माग. अन्यथा महिलांविरोधातील हिंसाचाराच्या प्रकरणात मी तुझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करू शकते.”
