FIFA World Cup 2026 France vs Paraguay: किलियन एमबाप्पेने पेनल्टीवर केलेल्या विजयी गोलच्या जोरावर फ्रान्सने राऊंड ऑफ-१६ सामन्यात पराग्वेचा १-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम शिट्टीनंतर मैदानावर वादाचं चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. पॅराग्वेच्या गोलकिपरने सामन्यानंतर एम्बाप्पेच्या पाठीवर चेंडू फेकून मारला, यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
फ्रान्स आणि पॅराग्वे यांच्यातील सामन्यात पहिल्या ६९ मिनिटांत कोणताही गोल झाला नाही. त्यानंतर, फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टीवर किलियन एमबाप्पेने गोल केला आणि स्कोअर १-० असा झाला; सामन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहिली आणि फ्रान्सने पुढील फेरीत धडक मारली. या सामन्यात गोल केल्यामुळे, २०२६ फिफा विश्वचषकातील ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत एम्बाप्पे आता लिओनेल मेस्सीच्या बरोबरीवर आला आहे. फ्रान्सचा सामना आता उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोशी होणार असून, हा सामना १० जुलैला पहाटे १:३० वाजता खेळवला जाणार आहे.
सामना संपल्यानंतर पराग्वेचा गोलरक्षक ऑर्लॅंडो गिल एमबाप्पेला अभिनंदन करण्यासाठी हस्तांदोलन करण्यास पुढे आला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करण्यात मग्न असलेल्या फ्रान्सच्या कर्णधाराने त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं करत पुढे निघून गेला. या गोष्टीचा राग आल्याने गिलने बॉल एमबाप्पेच्या पाठीवर फेकला आणि तिथून निघून गेला. मात्र, एमबाप्पेने या प्रकाराकडे कोणतीही प्रतिक्रिया न देता फ्रान्सच्या विजयाचा आनंद साजरा करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे हा वाद अधिक वाढला नाही.
दोन वेळच्या विश्वविजेत्या फ्रान्सला पूर्ण ९० मिनिटे कडवी झुंज देणाऱ्या पराग्वेकडून हा सामना अत्यंत चुरशीचा झाला होता. त्यानंतर अंतिम शिट्टीनंतर घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली.
पॅराग्वेविरूद्धचा हा सामना सोपा नसेल, याची फ्रान्सला आधीपासूनच कल्पना होती. पॅराग्वेने संपूर्ण सामन्यात बचावात्मक भूमिका घेत फ्रान्सच्या खेळाचा वेग खंडित करण्याचा प्रयत्न केला. वारंवार फाऊल करत त्यांनी संघाला शारीरिक संघर्षात अडकवण्याचा प्रयत्न केला. अखेर ७०व्या मिनिटाला किलियन एमबाप्पेने पेनल्टीवर अचूक गोल करत सामन्याचा निकाल फ्रान्सच्या बाजूने लावला.
डिझिरे डुए पेनल्टी क्षेत्रात धावत असताना डिएगो गोमेझकडून झालेल्या चुकीच्या टॅकलमुळे ही पेनल्टी मिळाली. सुरुवातीला पंचांनी खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय दिला होता. मात्र, व्हीएआर (VAR) तपासणीनंतर त्यांनी पेनल्टीचा निर्णय दिला. एम्बाप्पेने या संधीचा फायदा घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
