एपी, मियामी गार्डन : फ्रान्सला तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी या सामन्यात दोन गोल करुन किलियन एम्बापे गोल्डन बूटच्या शर्यतीत कायम राहिला. तसेच विश्वचषक स्पर्धेत २२ गोलची नोंद करत त्याने लिओनेल मेसीचा २१ गोलचा विक्रम मागे टाकला. मात्र, यानंतरही अंतिम सामन्यात खेळण्याची संधी हुकल्यामुळे तो असमाधानी होता.

या सामन्यातील दोन गोलमुळे स्पर्धेत एम्बापेच्या नावार १० गोल असून, तो मेसीपेक्षा दोन गोलने पुढे आहे. एका स्पर्धेत दहा गोल करण्याच्या जर्मनीच्या गर्ड मुलरच्या कामगिरीची त्याने बरोबरी केली. अंतिम सामन्यात मेसीला दोन गोल करण्यात अपयश आल्यास एम्बापे गोल्डन बूटाचा मानकरी ठरेल आणि विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोनदा गोल्डन बूट जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरेल. गोल्डन बूटसाठी असलेली शर्यत आणि सर्वाधिक गोलचा विक्रम एम्बापेच्या नावावर राहणार की नाही या निर्णयासाठी अंतिम सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

वैयक्तिक विक्रमाची नोंद झाल्यानंतरही एम्बापे सांघिक अपयशाने निराश होता. ‘‘मला विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमापेक्षा अंतिम सामना खेळायला जास्त आवडले असते. जेव्हा तुम्ही विश्वचषकात इतके गोल करता, तेव्हा ते तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते हे नक्की. पण, अंतिम सामन्यात खेळण्याला माझे पहिले प्राधान्य होते,’’ असे एम्बापे म्हणाला.

एम्बापेने या वेळी इंग्लंडने निष्प्रभ केल्याची कबुली दिली. या सामन्यात दोन्ही सत्रात पूर्णपणे वेगळा खेळ पाहायला मिळाला. पूर्वार्धातील आमचा खेळ पाहिल्यानंतर काही लोकांना एकवेळ आमचा रागही आला असेल. फ्रान्सच्या जर्सीचा सन्मान राखला नसल्याची भावनाही त्यांच्या मनात उमटली असणे सहाजिक आहे. ‘‘पहिल्या सत्रात आम्ही पूर्ण निष्प्रभ झालो होतो. इतके सामने सातत्यपूर्ण खेळल्यावर कधीतरी चूक होणारच, शेवटी आम्हीही माणूस आहोत. पण, अशा मोठ्या व्यासपीठावर आम्हाला अशी चूक परवडणारी नाही. इंग्लंडच्या धक्क्याने आम्हाला खर्‍या अर्थाने जागे केले. उत्तरार्धात आम्ही हे अपयश पुसून काढण्याचा प्रयत्न केला. पण, हा दिवस आमचा नव्हे, इंग्लंडचा होता,’’ असेही एम्बापेने सांगितले.

फ्रान्ससाठी प्रशिक्षक म्हणून अखेरच्या सामन्यासाठी उभे राहिलेल्या दिदिएर डेशॉम्प यांच्याविषयी देखील एम्बापेने आदर व्यक्त केला. ‘‘त्यांच्या अखेरच्या सामन्यात आम्ही जिंकू शकलो नाही हे खूप खेदजनक आहे. पूर्वार्धातील खेळाने ते निश्चित निराश असतील. पण, आम्हाला त्यांना अशी जाणीव करून द्यायची नव्हती. हा एक पराभव दिदिएर डेशॉम्प यांचा गौरवशाली वारसा आणि इतिहास कधीही डागाळू शकत नाही,’’ असे एम्बापे म्हणाला. पण, संपूर्ण कारकीर्दीचे मूल्यमापन या एका सामन्यावरून न करण्याचे आवाहन डेशॉम्प यांनी केले. तसेच, २०१२ पासूनच्या आपल्या प्रवासाचा हा ‘सर्वात सुंदर कालखंड’ असल्याचे डेशॉम्प यांनी सांगत, त्यांनी कर्णधार किलियन एम्बापेचे समर्थन केले.

पूर्वार्धात आमची कामगिरी सुमार झाली. मात्र, एका सामन्यावरून संघाच्या कामगिरीचा अंदाज बांधणे चुकीचे आहे. एम्बापे एक अविश्वसनीय कर्णधार आहे आणि यातील अनेक खेळाडूंप्रमाणेच त्यानेही प्रगती केली आहे. अंतिम सामन्यात खेळता न आल्यामुळे तो निराश आहे.     – दिदिएर डेशॉम्प, फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक.