युवा आक्रमणपटू मार्को असेन्सिओने साकारलेल्या हॅट्ट्रिकला अनुभवी करिम बेन्झेमाच्या दोन गोलची उत्तम साथ लाभल्यामुळे रेयाल माद्रिदने ला लिगा फुटबॉलमध्ये मायोर्का संघाचा ६-१ असा धुव्वा उडवला.

याबरोबरच माद्रिदने सलग चौथा आणि सहा सामन्यांतील पाचवा विजय नोंदवताना सर्वाधिक १६ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले. असेन्सिओने अनुक्रमे २४, २९ आणि ५५व्या मिनिटाला गोल नोंदवले. बेन्झेमाने तिसऱ्या आणि ७८व्या मिनिटाला गोल केले. ईस्कोने ८४व्या मिनिटाला संघासाठी सहावा गोल केला.

लीग-१ फुटबॉल

हकिमीने सेंट-जर्मेनला तारले

पॅरिस : २२ वर्षीय अचरफ हकिमीने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर अग्रस्थानावरील पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ फुटबॉल स्पर्धेत मेट्झचा २-१ असा पराभव केला. लिओनेल मेसीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या सेंट-जर्मेनसाठी हकिमीनेच पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला. बुबाकरने ३९व्या मिनिटाला मेट्झला बरोबरी साधून दिली. परंतु ९५व्या मिनिटाला हकिमीने नोंदवलेल्या गोलमुळे सेंट-जर्मेनने सलग सातव्या विजयाची नोंद केली.

लीग चषक फुटबॉल

चेल्सीची आगेकूच; मँचेस्टर युनायटेड पराभूत

लंडन : चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने गुरुवारी लीग चषक फुटबॉल स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मँचेस्टर युनायटेडला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. चेल्सीने अ‍ॅस्टन व्हिलावर १-१ (४-३) अशी पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली. गोलरक्षक केपा अरिझाबलागाने त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावली. वेस्ट हॅमने मात्र मॅन्युएल लान्झिनीच्या एकमेव गोलमुळे युनायटेडला १-० असा पराभवाचा धक्का दिला.