संकेत कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील देवीगवाण गावात राहणाऱ्या उमेश अशोक जगदाळे या मजुराच्या मुलाने कबड्डीत भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न बाळगले आहे.

नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत बीडच्या संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेशची घरची परिस्थिती बिकट आहे. मात्र, या गोष्टीचा खेळावर परिणाम होऊ न देण्याचा त्याने निश्चय केला आहे. ‘‘भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे लक्ष्य असून त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आर्थिकदृष्टय़ा मला आणि माझ्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागतो. माझे आई-वडील आणि भाऊ हे शेतीसह मजुरीचे काम करतात. मला भारताकडून खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे,’’ असे उमेश म्हणाला.

‘‘मीसुद्धा सकाळी ५ ते ७ या वेळेत सराव करून दिवसभर मजुरीचे काम करतो. मग संध्याकाळी ५ वाजता पुन्हा सरावासाठी मैदानात जातो. घरातील बिकट परिस्थितीमुळे मला कबड्डी खेळतानाच अन्य काम करावे लागते आहे. त्यामुळे मला माझ्या आहाराकडे लक्ष देणे शक्य होत नाही. मात्र, मी या गोष्टीचा माझ्या खेळावर परिणाम होऊ देत नाही,’’ असेही उमेशने सांगितले.

‘‘मागील वर्षी कुमार गटाच्या स्पर्धेसाठी माझी राष्ट्रीय संघात निवड झाली होती. मी महाराष्ट्राचेही प्रतिनिधित्व केले आहे. ‘प्रो कबड्डी’च्या यादीत माझे नाव होते, परंतु माझ्यावर बोली लागली नाही,’’ असे उमेश म्हणाला.

घरातूनच कबड्डीचे धडे

उमेशला कबड्डीचे धडे घरातच मिळाले. ‘‘माझे काका अनिल आणि कैलास जगदाळे हे कबड्डीपटू होते. सध्या कैलासकाका माझे प्रशिक्षक आहेत,’’ असे उमेश म्हणाला. ‘‘आमच्या दोन पिढय़ा हा खेळ खेळत आहेत. आता उमेश आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडेल अशी आम्हाला आशा आहे,’’ असे कैलास जगदाळे यांनी सांगितले.