|| अविनाश पाटील

खेलो इंडियाअंतर्गत १८ वर्षांखालील खो-खो स्पर्धा

नाशिक : युवा खेळाडूंच्या कौशल्याला वाव देणाऱ्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत यंदा प्रथमच खो-खो स्पर्धा १८ वर्षांआतील वयोगटासाठी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या वयोगटाच्या खो-खो स्पर्धा देशात कुठेही घेतल्या जात नाहीत. वयोगट नवीन असल्यामुळे स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने नवीनच अडचण निर्माण झाली आहे. 

फेब्रुवारी २०२२मध्ये हरयाणात खेलो इंडिया स्पर्धा होणार आहे. याआधीच्या तीन खेलो इंडियात महाराष्ट्राच्या मुली आणि मुलांनी खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची महाराष्ट्राची क्षमता असली तरी  तयारी म्हणून राज्य स्पर्धा घ्यावी लागणार आहे. यंदा नवीन वयोगटामुळे राज्यापुढे तयारीसाठी आर्थिक तरतूद कशी करावी, हा प्रश्न आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या संघाची निवड ही राज्यस्तरीय स्पर्धेतूनच केल्यास गुणवान खेळाडूंना अधिक संधी मिळत असल्याचे नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी म्हटले. निवड चाचणीद्वारे निवडलेल्या संघात गुणी खेळाडूंवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. खेलो इंडियासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे १८ वर्षांआतील वयोगटासाठी शालेय स्पर्धेच्या धर्तीवर तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य याप्रमाणे स्पर्धा घेण्याची गरज असून त्यासाठी शासनाने १० लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणीही ठाकूर यांनी क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  केली आहे.