भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. २०२५ मधील लक्ष्य सेनचं हे पहिलं जेतेपद आहे. लक्ष्य सेनने वर्ल्ड रॅकिंगमधील २७व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या युशी तनाकाचा दोन सेटमध्ये एकतर्फी पराभव केला. लक्ष्यने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला सेट २१-१५ तर दुसरा सेट २१-११ ने जिंकत स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलं.

रविवारी सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरी जिंकण्यासाठी लक्ष्यला ८० पेक्षा जास्त मिनिटे झुंज द्यावी लागली होती, परंतु अंतिम सामन्यात त्याने दमदार कामगिरी करत केवळ ३८ मिनिटांत विजय मिळवला. २०१७ मध्ये किदांबी श्रीकांतनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा लक्ष्य हा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू बनला आहे.

२०२१च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनच्या नावावर आता तिसरे सुपर 500 विजेतेपदाची नोंद झाली आहे. याआधी त्याने २०२२ मधील इंडिया ओपन आणि त्यानंतरच्या वर्षी कॅनडा ओपनवरही आपली मोहर उमटवली होती.