आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला(आयसीसी) समांतर अशा नव्या संघटनेची ‘ब्लू प्रिंट’ तयार असून या संघटनेच्या स्थापनेत सक्रिय असल्याची कबुली आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अशाप्रकारचे नवे प्रशासकीय मंडळ आकार घेत असल्यामागे सहभाग असल्याचे वृत्त याआधी खुद्द ललित मोदी यांनी फेटाळून लावले होते. मात्र, यावेळी ‘एबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदींनी या संघटनेच्या स्थापनेत आपण सक्रिय असल्याची खळबळजनक कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर ही संघटना ऑलिम्पिकशी जोडण्याची योजना आखली जात असल्याचा गौप्यस्फोट मोदी यांनी केला आहे.
क्रिकेटचा कायापालट करण्याचा आमचा उद्देश असून गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेवर काम सुरू आहे. या योजनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून त्यास मी सहमती देखील दिली आहे. योजनेवर आता केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी राहिले आहे, असे ललित मोदी यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. दरम्यान, या संघटनेत सामील होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नर आणि नुकताच निवृत्त झालेला कर्णधार मायकेल क्लार्क यांना बक्कळ पैसा देऊन गळ घातल्याचे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी याआधी दिले होते. आता ललित मोदी यांनी या नव्या संघटनेसोबत आपण काम करीत असल्याचा गौप्यस्फोटकरून क्रिकेट विश्वात धुमाकूळ उडवून दिला आहे.