Lalit Modi on Sachin Tendulkar-Rahul Dravid: आयपीएल स्पर्धेला अस्तित्त्वात आणणारे स्पर्धेचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. आयपीएल स्पर्धा कशी सुरू झाली, त्यासाठी त्यांना काय-काय निर्णय घ्यावे लागले, कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. यादरम्यान त्यांनी २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंच्या खेळण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडसारख्या खेळाडूंना विश्वचषक खेळण्यासाठी गयावया केल्याचं म्हटलं आहे.

ललित मोदी यांनी असा दावा केला आहे की, २००७ मधील पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास भारतातील अनेक स्टार क्रिकेटपटू इच्छुक नव्हते. त्यावर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान आपण स्वतः खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचं ललित मोदी यांनी सांगितलं.

१९ जुलै ते ८ सप्टेंबर २००७ या कालावधीत भारतीय संघाने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारताने तीन कसोटी आणि सात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, ११ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका येथे पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारखे वरिष्ठ खेळाडू संघात होते. मात्र, या तिघांनाही टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं.

२००७ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आलं होतं. संघात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, आर. पी. सिंग आणि इरफान पठाण यांसारखे खेळाडू होते. याच संघाने पुढे इतिहास रचत भारताला पहिल्या टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी सांगितलं की, २००७ मध्ये टी-२० हा नवा फॉरमॅट असल्याने अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी त्याला गांभीर्याने घेतलं नव्हतं. मोठ्या इंग्लंड दौऱ्यानंतर टी-२० विश्वचषकासाठी मुक्काम वाढवण्याचीही त्यांची इच्छा नव्हती.

ललित मोदींनी सांगितलं टी-२० वर्ल्डकप २००७च्या पडद्यामागचं सत्य

“२००७ मध्ये भारताचा इंग्लंड दौरा सुरू असताना मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन प्रत्येक खेळाडूशी बोललो. मी त्यांना विनंती केली की, ‘कृपया टी-२० विश्वचषक खेळा.’ पण त्यावर अनेकांनी मला विचारलं, ‘ललित, तू मस्करी करतोयस का? हा कसला मूर्खपणाचा खेळ आहे? आम्हाला तो खेळायचा नाही.’ ड्रेसिंग रूममधील जवळपास प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया होती.” ललित मोदी पुढे म्हणाले, “खेळाडूंनी सांगितलं की, ‘आमचा दौरा खूप मोठा झाला आहे. आम्हाला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.’ पण आजच्या काळात एखाद्या खेळाडूने विश्वचषक खेळण्यास नकार दिला, तर चाहत्यांपासून ते प्रशासकांपर्यंत सर्वत्र मोठा गदारोळ उडेल.”

मोदी यांनी हेही नमूद केले की, त्या वेळी बीसीसीआयने अनुभवी स्टार खेळाडूंऐवजी युवा संघाला टी-२० विश्वचषकासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आजच्या क्रिकेटच्या युगात असा निर्णय घेणं जवळपास अशक्य वाटेल, असेही त्यांनी सांगितलं. पण भारताच्या याच युवा संघाने तो २००७चा पहिला टी-२० विश्वचषक पटकावला होता.

ललित मोदी म्हणाले, “बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारताचा मुख्य संघ पाठवला नाही. त्यांनी दुसराच संघ पाठवला. ‘मुख्य भारतीय संघाला पाठवायचंच नाही, त्याऐवजी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली युवा संघ पाठवूया,’ असा विचार करण्यात आला. तो संघ पूर्णपणे नवखा आणि अनुभवहीन होता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांसारखे दिग्गज खेळाडू त्या संघात नव्हते. आज तुम्ही असा निर्णय स्वीकाराल का? आज कोणत्याही विश्वचषकासाठी भारताने ‘बी टीम’ पाठवली, तर चाहत्यांना ते मान्य होईल का? बोर्ड ते स्वीकारेल का?”

ललित मोदींच्या मते, सुरुवातीच्या काळात भारतात टी-२० क्रिकेटला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रसारमाध्यमे आणि जाहिरातदारांनाही या फॉरमॅटमध्ये विशेष रस नव्हता. ते म्हणाले, “भारतात कुणालाच टी-२० क्रिकेटवर विश्वास नव्हता. प्रेक्षक नसतील तर जाहिराती मिळत नाहीत, जाहिराती नसतील तर उत्पन्न मिळत नाही. लोक पाहतील तरच पैसा येईल. आज ज्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष आहे, तिथेच जाहिरातदारांचा पैसा जातो.”

मोदी यांनी आणखी एक मोठा दावा करत सांगितलं की, युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्यापूर्वी टी-२० विश्वचषक फारसा पाहिला जात नव्हता. “दक्षिण आफ्रिकेतील टी-२० विश्वचषकाला युवराजच्या सहा षटकारांपर्यंत फारसं रेटिंग नव्हतं. त्या क्षणानंतरच स्पर्धेकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. मी त्यासाठी प्रयत्न करत होतो. मी घोषणा केली होती की, जो खेळाडू एका षटकात सहा षटकार मारेल किंवा सहा विकेट घेईल, त्याला मी पोर्शे कार देईन. जेव्हा टी-२० क्रिकेटला फारसं महत्त्व मिळत नव्हतं, तेव्हा मी जगभर फिरून लोकांना या फॉरमॅटबद्दल पटवून देत होतो, कारण मला खात्री होती की टी-२० यशस्वी होणार.”