Lalit Modi On IPL Future: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. २००८ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा सध्या १९ व्या हंगामात पोहोचली आहे. माजी चेअरमन ललित मोदी यांना या स्पर्धेचे जनक म्हटले जाते. कारण त्यांच्या दूरदृष्टीतून या स्पर्धेची सुरुवात झाली होती. सध्या ते भारतात नाहीत, पण आयपीएल स्पर्धेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ललित मोदी यांच्या मते, आयपीएल २०३० पर्यंत खेळाडूंच्या मानधनात इतकी वाढ होईल, की खेळाडू देशाकडून खेळणं सोडून फक्त आयपीएल खेळण्याकडे वळतील.
आयपीएल २०२६ स्पर्धेपर्यंत ऋषभ पंत हा सर्वात मोठी बोली लागलेला खेळाडू आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यावर २७ कोटींची बोली लावली आहे. ललित मोदी यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, आयपीएलमध्ये एका खेळाडूला २ महिन्यांसाठी १५० कोटी रुपये मिळू शकतात. त्यांनी त्या खेळाडूचं नाव देखील सांगितलं आहे. ललित मोदी यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांना दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
ललित मोदी यांनी सांगितलं की, वर्तमानात आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक संघाची व्हॅल्यू ही १६,५०० कोटींच्या घरात आहे. त्यांनी असा दावा केला आहे की,आयपीएल २०३० पर्यंत म्हणजे इथून पुढे ४ वर्षांत ही व्हॅल्यू दुप्पट होऊ शकते. यासह आयपीएल लिलावात पर्सची रक्कम देखील वाढू शकते. ललित मोदी म्हणाले, “येणाऱ्या काही वर्षांत खेळाडूंच्या पर्सची रक्कम १०० मिलियन डॉलर्स (९३२ कोटी) पर्यंत जाऊ शकते. यानुसार एका खेळाडूला प्रत्येक सामन्यात १ लिमियन डॉलर्स (९.३ कोटी) मिळू शकतात.
या खेळाडूला मिळू शकतात १५० कोटी…
कोणत्या खेळाडूला १५० कोटी मिळू शकतात, त्या खेळाडूचं नाव देखील सांगितलं आहे. ललित मोदी यांनी इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलचं नाव घेतलं. ते म्हणाले, “जेकब बेथेल २०३० पर्यंत प्रत्येक हंगामात १६ मिलियन डॉलर्स (१५० कोटी) कमावू शकतो.” जेकब बेथेलने २०२६ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सेमी फायनलमध्ये दमदार शतक झळकावलं होतं. त्याने इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. पण इंग्लंडचा विजय थोडक्यात हुकलं होता. आयपीएल २०२६ स्पर्धेत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. पण आतापर्यंत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
