Lalit Modi On Sanjiv Goenka: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पाचवा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना लखनौतील एकाना स्टेडियममध्ये पार पडला. लखनौच्या फलंदाजांकडून या सामन्यात फ्लॉप शो पाहायला मिळाला. संपूर्ण डाव अवघ्या १४१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं आव्हान १७.१ षटकात पूर्ण केलं. लखनौच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. पण एकटा समीर रिझवी लखनौवर भारी पडला. सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं, जे २०२४ मध्ये पाहायला मिळालं होतं. त्यावेळी केएल राहुल होता, तर यावेळी ऋषभ पंत. लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका आणि ऋषभ पंतचे चर्चा करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर ललित मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फुटबॉलमध्ये सामना गमावल्यानंतर, संघमालक किंवा मॅनेजर आपल्या खेळाडूंसोबत आदराने वागतात. पण आयपीएलमध्ये असं पाहायला मिळत नाही, असं ललित मोदी यांचं म्हणणं आहे. ललित मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “फुटबॉल लीगचे मालक खेळाडूंशी आदराने आणि दीर्घकालीन विचार करून प्रोफेशनल वागतात. याउलट, आयपीएल स्पर्धेतील संघमालक अनेकदा प्रसिद्धी आणि हेडलाईन्सच्या मागे धावतात. सामना गमावल्यानंतर थेट बाऊंड्रीलाईनवर येऊन संघाच्या कर्णधाराला सर्वांसमोर सुनावतात. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी दीर्घकालीन पायाभूत सुविधांचा विचार कोण करतं?”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “आयपीएलकडे आधीच पैसा, ग्लॅमर आणि लोकांचे लक्ष आहे. फ्रँचायझींचे मूल्य आता अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. जरा विचार करा, जर संघमालकांनी फुटबॉलप्रमाणे संयम दाखवला आणि दर्जा जोपासला, तर हे व्हॅल्यूएशन कदाचित आणखी योग्य वाटेल.”
ललित मोदी यांना आयपीएलचे जनक असे म्हटले जाते. २००८ मध्ये जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरू झाली होती, त्यावेळी ही स्पर्धा सुरू करण्यात ललित मोदी यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता सध्या ते लंडनमध्ये आहेत. पण लंडनमध्ये असूनही ते या लिगबाबत आपलं मत मांडत असतात.
