Lalit Modi on IPL Success and Legacy: आयपीएलने जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा लीगपैकी एक स्पर्धा अशी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेने फ्रँचायझी-आधारित क्रीडा स्पर्धांसाठी नवा मापदंड निर्माण केला आहे. जगभरातील अनेक देशांनी आयपीएलच्या धर्तीवर स्वतःच्या लीग सुरू केल्या आहेत. तसेच, विविध क्रिकेट मंडळांच्या खेळाडू निवड प्रक्रियेवर आणि मोठ्या स्पर्धांसाठी प्रतिभा शोधण्याच्या पद्धतीवरही आयपीएलचा मोठा प्रभाव पडला आहे. आयपीएलचे संस्थापक ललित मोदींनी यादरम्यान स्पर्धेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ललित मोदी यांना आयपीएलचे शिल्पकार मानलं जातं. माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी नुकताच खुलासा केला की, मोदी यांनी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, टी-२० क्रिकेट अस्तित्वात येण्यापूर्वीच, बीसीसीआयसमोर अशा स्पर्धेची कल्पना मांडली होती. अखेरीस २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली आणि ३१ मे २०२६ रोजी स्पर्धेचा १९वा हंगाम संपन्न झाला. आज या लीगची किंमत अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे.
‘द स्कूप एक्स्टेंडेड’ या कार्यक्रमात ललित मोदी यांनी आपल्या आयपीएलमधील योगदानाचं समर्थन केलं. आयपीएल त्यांच्या शिवाय यशस्वी होऊच शकली नसती, असा दावा त्यांनी केला. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून टीका होत असूनही, आपण घेतलेल्या कोणत्याही निर्णयाकडे चूक म्हणून पाहत नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
ललित मोदी यांनी आयपीएलमधील आपल्या भूमिकेचे समर्थन करताना म्हणाले, “इतर अनेक कारणांमुळे मला टार्गेट करण्यात आलं. प्रत्येकजण माझ्यावर जळत होता. मी जसा होतो, तसा नसतो तर हे यश शक्यच झालं नसतं. माझ्याशिवाय आयपीएल स्पर्धा यशस्वी झालीच नसती. मी १७ वर्षांपासून या स्पर्धेचा भाग नाही, तरी आज तुम्ही माझी मुलाखत का घेत आहात? आयपीएलची कल्पना काही अचानक सुचलेली नव्हती. त्यामागे भरपूर वैज्ञानिक संशोधन आणि माझे अनेक अनुभव होते. जगभरातील अनेकांनी मी निर्माण केलेली गोष्ट उभी करण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले.”
आपल्या निर्णयांबाबत बोलताना मोदी यांनी ठाम भूमिका घेतली, “लोक म्हणतात की मी चुका केल्या, पण माझ्या मते मी कोणतीही चूक केलेली नाही. जर मला पुन्हा एकदा हे सर्व करण्याची संधी मिळाली, तर मी मागच्या वेळी जे केलं होतं त्यात काहीही बदल करणार नाही.”
ललित मोदी यांनी कबूल केलं की, भारत सोडताना काही महत्त्वाच्या गोष्टी अपूर्ण राहिल्याची खंत त्यांना आजही वाटते, “भारत सोडताना काही गोष्टी पूर्ण करता आल्या नाहीत, याची मला खंत आहे. आयपीएलच्या संस्थापकाला नेहमीच लीगच्या बोर्डावर एक जागा मिळायला हवी होती. मी बीसीसीआयला खूप जास्त अधिकार दिले. त्या काळात मी माझ्या अटी ठामपणे मांडू शकलो असतो, कारण बहुतेकांना वाटत होतं की आयपीएल अपयशी ठरेल. त्यामुळे त्यांना या प्रकल्पाची फारशी पर्वा नव्हती. मी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यासाठी संविधानही तयार केले होते.”
ललित मोदी यांच्या मते, बीसीसीआयला आर्थिक लाभ मिळत राहायला हवा होता, मात्र लीगचे प्रशासन हे फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त भागीदारीत चालवलं गेलं पाहिजे होतं, “बीसीसीआयला उत्पन्न मिळत राहिले असते, पण लीगचे प्रशासन आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआय यांच्या भागीदारीत असायला हवे होते.” दरम्यान, २०११ नंतर आयपीएल अध्यक्षपदाची जबाबदारी चिरायू अमीन, राजीव शुक्ला, रंजीब बिस्वाल, बृजेश पटेल आणि अरुण सिंह धुमाळ यांनी सांभाळली आहे. धुमाळ २०२२ पासून या पदावर कार्यरत आहेत.
