Cristiano Ronaldo Crying video online : सोमवारी फिफा विश्वचषक जिंकण्याचं पोर्तुगालचं स्वप्न भंगलं असून राउंड ऑफ १६ मध्ये स्पेनने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, परंतु अंतिम शिट्टीनंतर घडलेल्या एका भावनिक प्रसंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डॅलसमध्ये पोर्तुगालचा १-० असा पराभव झाल्यानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर झाले, त्यावेळी स्पेनचा तरुण खेळाडू लॅमिन यामाल याने रोनाल्डोचं सांत्वन करत त्याला जवळ घेतलं.
मायकेल मेरिनोने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलमुळे स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पेनचे खेळाडू त्यांच्या या रोमांचक विजयाचा आनंद साजरा करत असताना, यामल थोडा वेळ बाजूला होऊन रोनाल्डोला सांत्वन करण्यासाठी गेला. हा त्याचा शेवटचा विश्वचषक असल्याचं रोनाल्डोने नंतर स्पष्ट केल्यामुळे तो पुरता खचला होता. हा सामना दोन पिढ्यांमधील संघर्ष म्हणून पाहिला जात होता.
फुटबॉलमधील सर्वात तेजस्वी युवा प्रतिभांपैकी एक असलेल्या यामलने, खेळातील सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू रोनाल्डोसोबत एकाच मैदानात खेळण्याचा अनुभव घेतला आणि हा सामना पोर्तुगालच्या कर्णधाराचा शेवटचा विश्वचषक सामना ठरला. रोनाल्डोने सुरुवातीपासून खेळत पूर्ण ९० मिनिटे मैदानात घालवली, मात्र स्पेनने पोर्तुगालला रोखून धरल्यामुळे रोनाल्डोला सामन्यावर आपला प्रभाव पाडता आला नाही. त्याचा सर्वोत्तम प्रयत्न गोलरक्षक उनाई सायमनने सहज रोखला, त्यानंतर अतिरिक्त वेळेत मेरिनोने गोल करत सामन्याचा निकाल स्पेनच्या बाजूने लावला.
‘भविष्याबाबत कोणताही खुलासा नाही’
सामन्यानंतर बोलताना रोनाल्डोने मान्य केलं की हा पराभव स्वीकारणे कठीण आहे, पण आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या भविष्याबाबत आपण कोणताही घाईघाईने निर्णय घेणार नसल्याचं त्याने सांगितलं. रोनाल्डो पत्रकारांना म्हणाला, “विश्वचषकातून अशा प्रकारे बाहेर पडल्यामुळे मला दुःख झालं आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावलं, माझं सर्वोत्तम दिलं आणि मी स्पष्ट मनाने बाहेर पडत आहे. होय, हा माझा शेवटचा विश्वचषक होता, पण आता मला विचार करण्यासाठी आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळेल. मी भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेणार नाही.”
