काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये माकड येऊन बसलं होतं. या प्रकाराने जागतिक पातळीवर नाचक्की झाल्यानंतर आता बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रशासनाने अनोख्या क्लृप्त्या अवलंबल्या आहेत. माकडांना दूर ठेवण्यासाठी त्यांची मिमिक्री करणाऱ्या मंडळींना ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं आहे.
त्रासदायक पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी विशिष्ट आवाज काढणारं अमेरिकेतलं मशीन मागवण्यात आलं आहे. कबुतरं दूर जातील यासाठी बिनविषारी जेल, स्वयंचलित पद्धतीने बंद होणारी डबल डोअर अशा विविध गोष्टी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
वन्यजीव कायद्यानुसार लंगूर माकडांचा वापर बंद करण्यात आल्याने प्रशिक्षित माणसं माकडांचा आवाज काढतात. एब अलाय ओ या नावाचा हिंदी चित्रपट आला होता. माकडांना दूर करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा आवाज काढला जातो. तसा आवाज हेच चित्रपटाचं नाव होतं.
राजधानी दिल्लीत होणार असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी असा आवाज काढू शकणाऱ्या चारजणांना नियुक्त करण्यात आलं आहे.
हे कौशल्य परंपरागत स्वरुपात मिळालं आहे. मला माझ्या वडिलांकडून ही कला प्राप्त झाली. पण माझ्या मुलाने हे काम करू नये असं वाटतं असं जब्बारने सांगितलं. जब्बार दिल्लीतल्या रोहिणी भागात राहतो आणि नियुक्त चार लोकांपैकी एक आहे. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या अतिमहत्त्वाच्या सत्ताकेंद्रातही माकडं उच्छाद मांडतात. त्यावेळी जब्बारसारख्या मंडळींना रीतसर टेंडर काढून बोलावलं जातं. हे काम जब्बारला महिनाकाठी २५००० रुपये मिळवून देतं.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माकड प्रेक्षकांमध्ये येऊन बसलं होतं. याच स्पर्धेदरम्यान कबुतरांमुळे सामना थांबवण्याची वेळ ओढवली होती. अनेक दिवस बंद राहिलेल्या स्टेडियममध्ये स्पर्धा आयोजित केल्याने प्राण्यांचा वावर सातत्याने राहिला. पुन्हा अशी नामुष्की ओढवू नये यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने कंबर कसली आहे.
या स्टेडियमला तीन मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर सिंगल डोअर आहे. ज्यावेळी दरवाजा उघडा राहतो, कोणीही आत येऊ शकतं असं भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यकारी संचालक अंबर प्रताप सिंग यांनी सांगितलं. ऑटोमॅटिक डबल डोअर या त्यावरचा एक तांत्रिक उपाय. माकडांसारखा आवाज काढून पळवून लावणारे हा दुसरा उपाय. भारतीय बॅडमिंटन संघटना याखेपेस कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
लायटिंगचा मुद्दा मार्गी
इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान स्टेडियममधल्या लायटिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. सामन्यादरम्यान कोर्टवर सावली पडू नये अशा पद्धतीने लायटिंग करण्यात आलं आहे. २,२०० आणि २४०० प्रकाशमान देणारे दिवे कोर्ट्सवर समान अंतरावर बसवण्यात आले आहेत. कोर्टच्या वरच्या बाजूला पांढरा प्रकाश देणारा दिवा नेहमीप्रमाणे बसवण्यात आला आहे. सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर तसंच पुरस्कार वितरणावेळी खेळाडूंना त्रास होऊ नये यासाठी खास पद्धतीचे दिवे बसवण्यात आले आहेत.
बॅडमिंटन स्पर्धांच्या प्रवेशद्वारापाशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी २३ ऑगस्टला आतषबाजी करण्यात येणार आहेत. कोल्ड फायर या पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करण्यात येईल असं भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी सांगितलं.
इंदिरा गांधी स्टेडियममधल्या छपराची दुरुस्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. स्पर्धेदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाबाबत खेळाडूंनी तक्रार केली होती. पावसामुळे प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान डेन्मार्कची खेळाडू मिआ ब्लिचफेडने अस्वच्छतेची तक्रार केली होती. स्पर्धेदरम्यान स्वच्छतेची काळजी करावी लागणार नाही. इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान जी स्थिती होती त्यात अमूलाग्र बदल झाला आहे. खाशाबा जाधव स्टेडियममध्ये प्रॅक्टीस कोर्टही तयार करण्यात आलं आहे.
एकंदरीत बॅडमिंटन विश्वातल्या महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे.
