IPL 2026 Fans Fumes At Mid inning Light and Lazer show: लाईव्ह मॅचदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा अगम्य प्रकार आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण लढतीत पाहायला मिळाला. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या धरमशाला इथल्या स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. पहिली इनिंग्ज संपल्यानंतर मैदानाचं सांस्कृतिक व्यासपीठात रुपांतर झालं.

अर्धा तास चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात व्हायोलिन जुगलबंदीने झाली. मॉँ तुझे सलाम आणि चक दे इंडियाच्या धूनवर ही जुगलबंदी रंगली. त्यानंतर लेझर शो झाला आणि मग मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच इंधन वाचवा, संसाधनं वाचवा असं आवाहन केलं होतं. मात्र प्लेऑफसारख्या महत्त्वपूर्ण लढतीदरम्यान खेळाडूंची एकाग्रता भंग करून एवढा मोठा कार्यक्रम गरजेचा होता का असा प्रश्न विचारला जातो आहे.

सोशल मीडियावर लोकांनी कठोर शब्दात या कार्यक्रमावर टीका केली आहे. मैदानात डीजेवर गाणी वाजतात हे ठीकेय पण सामना सुरू असताना अर्धा तास अशा स्वरुपाचा कार्यक्रम करणं हे विचित्र आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. इंधन वाचवा यासाठी उपाययोजना सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी कोणासाठी असा सवाल अनेकांनी विचारला आहे.

चाहते क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आले आहेत. तो त्यांना शांतपणे पाहू द्या असंही अनेकांनी म्हटलं आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता या मोठ्या केंद्रांऐवजी धरमशालाला प्लेऑफसारखी महत्त्वपूर्ण लढतीचा मान देण्यात आला आहे. लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी हे शक्तीप्रदर्शन आहे अशी खोचक टीकाही काहींनी केली आहे.

या सगळ्या अनावश्यक कार्यक्रमामुळे प्रचंड प्रदूषण झालं. फटाके फोडल्यानंतर मैदानात त्याचा धूर जाणवत होता. स्वच्छ वातावरणात हा कचरा निर्माण करण्याचं काही कारणच नाही असं अनेकांनी म्हटलं आहे.

काही वर्षांपूर्वी आयपीएलदरम्यानच्या लेझर शो वर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने नाराजी व्यक्त केली होती. सामन्यात कसं खेळायचं यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा या लेझर शोमुळे नीट बोलता आलं नाही, शांतपणे एकाग्र चित्त करू शकलो नाही असं मॅक्सवेलने म्हटलं होतं.