IPL-2021 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या मोसमातील शेवटचे दोन सामने संध्याकाळी साडेसात वाजता एकाच वेळी खेळले जातील. हे दोन्ही सामने ८ ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. हा सामना सनरायझर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. 

बीसीसीआयने निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये एकाच वेळी दोन सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. सहसा, जेव्हा-जेव्हा आयपीएलमध्ये दुहेरी हेडर असतात, दिवसात एक सामना आणि संध्याकाळी एक सामना खेळला जातो, परंतु यावेळी प्रथमच दोन्ही सामने एकाच वेळी खेळले जातील. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला की, लीग स्टेजच्या शेवटच्या दिवशी, एक दुपारचा सामना आणि एक संध्याकाळचा सामना न करता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असे दोन सामने एकाच वेळी संध्याकाळी ७.३० वाजता खेळले जातील. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या वृत्ताची माहिती दिली आहे.

आयपीएलचा सध्याचा हंगाम भारतात खेळला जात होता, परंतु मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघांमध्ये करोना संसर्गाचे प्रकरणे आढळेले होते. या कारणास्तव लीग पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा निर्णय घेतला. लीगच्या सध्याच्या हंगामाचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि आता तो १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. साखळीचा टप्पा ८ ऑक्टोबरला संपेल. यानंतर प्लेऑफ सामने खेळले जातील.