लंडन : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नोव्हाक जोकोव्हिचने टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन करताना लेव्हर चषक टेनिस स्पर्धेत युरोप संघासाठी एकेरी आणि दुहेरीच्या लढतीत विजयांची नोंद केली. त्याच्या कामगिरीमुळे युरोप संघाने जागतिक संघाविरुद्ध ८-४ अशी आघाडी घेतली आहे.

जोकोव्हिचने एकेरीत जागतिक संघाच्या फ्रान्सिस टिआफोचा ६-१, ६-३ असा सहज पराभव केला. त्यानंतर तासाभरात त्याने इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीच्या साथीने जागतिक संघाच्या जॅक सॉक-अ‍ॅलेक्स डी मिनौर जोडीला ७-५, ६-२ असे पराभूत केले. विम्बल्डन स्पर्धेनंतर कोविड लस न घेतल्यामुळे जोकोव्हिचला अमेरिकेत झालेल्या विविध स्पर्धापासून दूर राहावे लागले.

त्यापूर्वी पहिल्या एकेरीच्या लढतीत बेरेट्टिनीने जागतिक संघाच्या फेलिक्स ऑगर अ‍ॅलिसिमेचे आव्हान ७-६ (१३-११), ४-६, १०-७ असे परतवून लावले. दुसऱ्या एकेरीच्या लढतीत जागतिक संघाच्या टेलर फ्रिट्झने कॅमेरुन नॉरीवर ६-१, ४-६, १०-८ असा विजय मिळवला.