पाकिस्तानी क्रिकेट संघाने बांगलादेशमधील मीरपूरमध्ये सरावादरम्यान मैदानामध्ये पाकिस्तानी राष्ट्रध्वज नेट्समध्ये फडकावला. या प्रकरणावरुन आधी पाकिस्तानी संघाला बांगलादेशी चाहत्यांचा विरोध सहन करावा लागल्यानंतर आता हे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे. मिरपूरमधील प्रकरणानंतर पाकिस्तानी संघाने पुढील सराव सामन्यांसाठी झेंडा वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र मीरपूरमधील प्रकरणावरुन आता पाकिस्तानी संघाविरोधात पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.

बांगलादेशची राजधानी असणाऱ्या ढाका शहरामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण पाकिस्तानी संघाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये कर्णधार बाबर आझमबरोबरच संघातील खेळाडूंबरोबरच सहकारी अशा सर्वांची मिळून एकूण २१ जणांच्या नावांचा समावेश आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची तयारी असतानाच न्यायालयाने ही तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. यासंदर्भातील वृत्त रेझिंग बीडी (बांगलादेश) डॉट कॉमने दिलं आहे. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याने ही तक्रार आता ग्राह्य धरली जाणार नसल्याचे समजते.

प्रकरण काय…
मालिका सुरु होण्यापूर्वीच्या एका सरावादरम्यान मीरपूरच्या मैदानामध्ये पाकिस्तानी संघाने नेट्समध्येच आपला राष्ट्रध्वज लावला. यावरुनच आता वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशमधील अनेक क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानी संघाने मुद्दाम खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र्य होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी हे राजकीय हेतूने केल्याचा आरोप केला होता. अनेक देशांनी बांगलादेशचा दौरा केलाय. अनेक देश इथे येऊन सामने खेळले आहेत. मात्र कोणत्याच देशाने सरावादरम्यान आपल्या देशाचा झेंडा बांगलादेशच्या भूमीवर रोवला नाही. पाकिस्ताननेच असं का केलं? त्यांना यामधून काय सिद्ध करायचं आहे, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेत.

नियम काय सांगतो…
बांगलादेशमध्ये पूर्वी संघांचे राष्ट्रध्वज सामन्यांआधी फडकवण्यात यायचे. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०१४ साली या नियमामध्ये बदल केला होता. परदेशी संघांना त्यांचा राष्ट्रध्वज आणण्याची परवानगी बांगलादेशने नाकारली होती. या निर्णयावरुन बरीच टीका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलेला. बांगलादेश हा पूर्वी पाकिस्तानचाच भाग होता. भारताच्या मदतीने बांगलादेशला स्वांतंत्र्य मिळालं.

पाकिस्तानी संघाचं स्पष्टीकरण…
हा विरोध एवढा वाढला की त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. मागील दोन महिन्यांपासून पाकिस्तानचा संघ सरावादरम्यान आपल्या देशाचा झेंडा लावूनच सराव करत असल्याचं पीसीबीने म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाच्या प्रसारमाध्यम संयोजकांनी स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं. “आमच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाहीय. सकलेन मुश्ताक संघामध्ये सहभागी झाल्यापासून हा त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. देशाचा झेंडा खेळाडूंना प्रेरणा देतो असं त्यांचं मत आहे,” असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

हकलवून देण्याची मागणी…
सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानच्या संघाला फार ट्रोल करण्यात आलं. सरावादरम्यान पाकिस्तानचा झेंडा लावू नये, लावलेला झेंडा काढून टाकावा अशी मागणी करण्यात आलेली. काही युझर्सने हा प्रकार लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं. काहींनी तर टोकाची भूमिका घेत पाकिस्तानविरुद्धची मालिका रद्द करुन या अशा प्रकारांविरोधात सरकार कठोर असल्याचा संदेश द्यावा असंही म्हटलेलं. पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या या कृतीसाठी देशातून हकलवून द्यावं अशीही मागणी अनेकांनी केलीय.

कसोटी मालिका आजपासून…
पाकिस्तान सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून आजपासून म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा प्रारंभ होणार आहे. पाकिस्तानने यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेमध्ये यजमान संघाला धूळ चारली. आता कसोटीमध्ये कमबॅक करण्याच्या दृष्टीने बांगलादेशचा संघ मैदानात उतरेल असा त्यांच्या चाहत्यांना विश्वास आहे. पहिली कसोटी २६ नोव्हेंबरपासून तर दुसरी चार डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.