Laxman Shiv Rama Krishnan Cricket Career: बीसीसीआयला दोष देत भारताच्या माजी खेळाडूने काही दिवसांपूर्वी समालोचनमधून निवृत्ती घेतली होती. लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी रंगभेदाचा बीसीसीआयवर आरोप करत निवृत्ती घेतली. यानंतर आता त्यांनी मोठा खुलासा करत ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्याच संघातील खेळाडूंनी त्यांना कशी वागणूक दिली, याबाबत सांगितलं.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची क्रिकेट कारकीर्द ही काही सर्वसामान्य नव्हती. तर टोमणे, तिरस्कार आणि वंशद्वेषाने त्यांचा क्रिकेट प्रवास भरलेला होता, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खालावला होता. मैदानावर प्रेक्षक त्याला ‘कालिया’ म्हणत, तर ड्रेसिंग रूममध्ये त्याचेच संघसहकारी त्याला ‘कुरूप’ म्हणून हिणवत असत.

या दुखावणार्‍या शब्दांनी एका तरुण खेळाडूच्या मनात इतकं विष पेरलं गेलं की, त्यांना स्वतःचीच भीती वाटू लागली. ते आरशात स्वतःकडे पाहणं टाळू लागले, रात्री झोपल्यानंतर भीतीने दचकून उठत आणि हळूहळू नैराश्यात अधिक खोलवर जात होते. ही कहाणी केवळ एका क्रिकेटपटूची नाही, तर आपल्याच माणसांचे शब्द जेव्हा आपल्याला टोचतात तेव्हा माणसातचं कसं खच्चीकरण होतं, हे सांगणारी आहे.

लक्ष्मण शिवरामकृष्णन भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर होते. त्याच दौऱ्यादरम्यान त्याने आपला १७ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना केक कापण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तो केक महान सुनील गावस्कर यांनी त्यांच्यासाठी मागवला होता. तो केक पाहून एका सहकारी खेळाडूने सुनील गावस्कर यांना म्हटले, “अरे सनी, तुम्ही अगदी योग्य रंगाचा केक मागवला आहे. एका सावळ्या मुलासाठी इतका डार्क चॉकलेट केक.” लक्ष्मण शिवरामकृष्णनने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना हे सांगितलं, “मी रडू लागलो आणि केक कापायला नकार दिला. सुनील गावस्कर यांना मला शांत करावं लागलं आणि मग मी डोळ्यात अश्रू असतानाच केक कापला.”

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना अशा परिस्थितीचा सामना करण्याची ही पहिली वेळ नव्हती. वयाच्या चौदाव्या वर्षी, चेपॉकमध्ये एका वरिष्ठ भारतीय फलंदाजाने त्यांना मैदान कर्मचारी समजून आपले बूट साफ करायला सांगितले होते. तामिळनाडूच्या ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ खेळाडू त्यांना ‘कुरूप’ म्हणत असत. उत्तर भारतातील स्टेडियममध्ये ते सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असतानाही, प्रेक्षक ‘कालिया, कालिया!’ म्हणत त्यांना चिडवत असत.

शिवरामकृष्णन यांच्याबरोबर पाकिस्तान दौऱ्यादरम्यान काय घडलं होतं?

भारतीय संघाचा सदस्य असूनही शिवरामकृष्णन यांना मुंबईतील एका हॉटेलच्या गेटकीपरने आत येऊ दिलं नाही. गेटकीपरने त्यांचा रंग आणि वय पाहून, ते भारतीय क्रिकेटपटू असणं अशक्य असल्याचं म्हटलं. एका सहकारी खेळाडूने त्यांची ओळख पटवून देईपर्यंत त्यांना थांबावं लागलं, ज्यासाठी एक तास लागला. हे मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल होतं.

“त्यानंतर माझ्या लक्षात आलं की चाव्या मी स्वतःजवळच ठेवायला हव्यात. पण प्रत्येक वेळी जेव्हा मी गेटजवळ जायचो, तेव्हा भीतीने माझे अंग थरथरायचे. मला भीती वाटायची की मला पुन्हा आत येण्यास मनाई करून बाहेर काढलं जाईल. तेव्हा मी सोळा वर्षांचा होतो.” लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्यासाठी भारताचा पाकिस्तान दौरा एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता.

हेही वाचा

पाकिस्तानी प्रेक्षकांची एक वेगळीच शैली होती. महिनाभर ‘कालिया, कालिया, कालिया’चा गजर, या सगळ्यामुळे एक व्यक्ती म्हणून माझा आत्मविश्वास ढासळला होता. इतक्या लहान वयात जेव्हा तुमचा आत्मविश्वास इतका कमी असतो, तेव्हा तो पुन्हा निर्माण करणं खूप कठीण असतं. मी हे सगळंच विसरून जायचं होतं, विसरून जायचं होतं, विसरून जायचं होतं, पण ते नेहमीच तुमच्या सुप्त मनात खोलवर रेंगाळत राहतं आणि अखेरीस बाहेर येतंच.”

“मी पूर्णपणे खचलो होतो आणि मला आरशात स्वतःकडे बघायचीही इच्छा होत नव्हती. मी दारू पिऊन झोपून जायचो. मी असं वागायचो कारण मला काही सहन होत नव्हतं. जेव्हा कधी मला जाग यायची, तेव्हा मला वाटायचं की मी आता मरणार आहे. दारू ही एकमेव गोष्ट होती ज्यामुळे मला झोप लागायची,” असा अंगावर काटा आणणारा प्रसंग शिवरामकृष्णन यांनी सांगितला.

आयपीएलच्या वेळेला जीव द्यावा असं वाटतं होतं – लक्ष्मण शिवरामकृष्णन

लक्ष्मण शिवरामकृष्णन पुढे म्हणाले, “कधीकधी, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान दुबईमध्ये प्रवास करताना वेगमर्यादा नव्हती. गाडी खूप वेगाने जात असेल तर, दरवाजा उघडून बाहेर उडी मारण्याचा मोह व्हायचा. पण काहीतरी होऊन कसंतरी मला ते मूर्खपणाचे कृत्य करण्यापासून रोखलं.”

“रात्री मला भास होऊ लागले. तुम्ही डोळे मिटता आणि तुम्हाला अशा प्रतिमा दिसतात ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सगळं काही खूप भीतीदायक असतं. तुम्ही डोळे उघडता आणि तिथे काहीच नसतं, पण तुम्ही इतके थकलेले असता की तुम्हाला झोपायचं असतं. तुम्ही डोळे मिटता आणि त्याच भयंकर गोष्टी पुन्हा घडतात. तुम्ही डोळे उघडता आणि तिथे काहीच नसतं. मग तुमची खात्री पटते की काहीही चुकीचं घडलेलं नाही. तुम्ही थोड्या वेळासाठी डोळे मिटता, पुन्हा उघडता आणि शेवटी तुमची झोप उडते.”

दारू पिण्यामुळे नैराश्य अधिकच वाढलं आणि नैराश्यामुळे दारू पिण्याला अधिकच चालना मिळाली. प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला त्यात अधिकच गुंतवून घेता आणि संपूर्ण जग तुम्हाला सांगतं, ‘बघा, मी तुला सांगितलं होतं. दारू हेच कारण आहे. मी तुला सांगितलं होतं.’ असं विचित्र आणि भयानक अनुभव शिवरामकृष्ण यांनी सांगितला.