भारताच्या माजी खेळाडूने बीसीसीआयवर मोठे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी २३ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी वंशभेद आणि भेदभाव होत असल्याचा आरोप केला असून, संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

भारताचा माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) गंभीर आरोप करत समालोचन कारकिर्दीला पूर्णविराम दिला. सामाजिक माध्यमावर त्यांनी आपली खंत व्यक्त करत त्यांनी पोस्ट शेअर केली.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी म्हटलं, “२३ वर्षांत एकदाही नाणेफेक किंवा सादरीकरणासाठी माझी निवड केली नाही. उलट नवीन येणाऱ्यांना पिच रिपोर्ट, नाणेफेक आणि सादरीकरणाची संधी दिली जाते, अगदी शास्त्री प्रशिक्षक असतानाही. मग यामागचं कारण काय असू शकतं?”

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सांगितलं की, दोन दशकांहून अधिक काळ संघटनेचा भाग असूनही नाणेफेक घेणं किंवा सामन्यानंतरचे सादरीकरण अशा महत्त्वाच्या ऑन-एअर भूमिकांपासून त्यांना सतत दूर ठेवण्यात आलं. एका युजरने भेदभाव केल्याचं हे कारण असू शकतं असे म्हटल्यावर त्यांनी त्याला प्रतिसाद देत, “तू बरोबर आहेस. रंगावरून भेदभाव,” असं स्पष्टपणे लिहिलं.

यानंतर त्यांनी, “मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी समालोचनातून निवृत्त होत आहे,” असं जाहीर केले. सलग काही पोस्टद्वारे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ६० वर्षीय शिवरामकृष्णन यांनी पुढे लिहिलं, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हक्क असलेली कंपनी कशी घसरते? काही अंदाज आहे का?” दूरचित्रवाणी निर्मितीवर थेट निशाणा साधत त्यांनी म्हटलं, “माझी निवृत्ती काही मोठी गोष्ट नाही. पण यामागे दूरचित्रवाणी निर्मितीची एक मोठी कहाणी दडलेली आहे. लवकरच तुम्हाला यामागचं मोठं चित्र दिसेल.”

लक्ष्मण शिवरामकृष्णन कोण आहेत?

लक्ष्मण शिवरामकृष्णन हे भारताचे माजी लेग-स्पिनर असून त्यांनी १९८३ ते १९८६ दरम्यान भारतासाठी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी २६ बळी घेतले असून त्यात तीन वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १५ बळी घेतले. ‘सिवा’ या टोपणनावाने ओळखले जाणारे शिवरामकृष्णन यांनी २००० साली समालोचन कारकिर्दीची सुरुवात केली.

१९८३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांनी कसोटी पदार्पण केलं. तरुण वयातच देशांतर्गत सामन्यात २ धावांत ७ बळी घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. पदार्पणाच्या कसोटीत त्यांना एकही बळी घेता आला नाही, मात्र १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ बळी घेत त्यांनी सामना जिंकून देत आपल्या गोलंदाजांची सर्वांवर छाप पाडली. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीत खेळाडू प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिलं आहे.