पीटीआय, नवी दिल्ली : दुसऱ्यांदा करोना चाचणीचा अहवाल बुधवारी सकारात्मक आल्यामुळे भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५ वर्षांत प्रथमच भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाजाकडे दिले जाणार आहे. कपिल देव हे भारताचे याआधीचे अखेरचे वेगवान गोलंदाजी करणारे कर्णधार होते. १९८७मध्ये त्यांना कर्णधारपदावरून काढण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत परंपरागत क्रिकेटमध्ये कोणत्याही वेगवान गोलंदाजाने भारताचे नेतृत्व केलेले नाही.

‘‘रोहितच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पुन्हा सकारात्मक आला आहे. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. रोहित सध्या विलगीकरणात असून, उपकर्णधार केएल राहुलसुद्धा या सामन्यात खेळणार नसल्याने बुमराकडे कर्णधारपद देण्यात आले आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सांगितले.

भारतीय संघ १९३२पासून कसोटी क्रिकेट खेळत असून, बुमरा हा ३६वा कर्णधार आहे. २९ कसोटी सामन्यांत १२३ बळी मिळवणारा गुजरातचा बुमरा हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. भविष्यातील कर्णधार म्हणून बुमराकडे पाहिले जात असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आधीच म्हटले आहे.

आयर्लंड मालिकेचाच संघ इंग्लंडशी खेळणार

इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना ५ जुलैला संपणार आहे, तर पहिला ट्वेन्टी-२० सामना ७ जुलैला होणार आहे. या पार्श्वभूमीवर तारांकित कसोटी खेळाडूंना विश्रांती देत पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील विजयी संघ खेळवण्यात येणार आहे, असे संकेत निवड समितीकडून मिळत आहेत. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी मात्र कोहली, बुमरा, पंत, जडेजा आणि रोहित हे खेळाडू उपलब्ध होऊ शकतील. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.

पुजारा की विहारी सलामीला?

रोहितने माघार घेतल्यामुळे युवा शुभमन गिलच्या साथीने चेतेश्वर पुजारा किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला सलामीला उतरावे लागणार आहे. राखीव सलामीवीर म्हणून मयांक अगरवाल इंग्लंडमध्ये पोहोचला असला तरी अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान देणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. २०१८च्या ऑस्ट्रेलियामधील मालिकेत गिलने काही काळ सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. परंतु पुजाराला सलामीला पाठवण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. त्यामुळे पुजारा, गिल, विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा अशी भारताची फलंदाजीची फळी असेल. बुमराच्या साथीने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. परंतु शार्दूल ठाकूर हा चौथा वेगवान गोलंदाज खेळवायचा की फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी द्यावी, हा पेच भारतापुढे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lead bumrah india fifth test against england yshy
First published on: 30-06-2022 at 00:37 IST