दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्राला आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले. भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या या निर्णयाविरोधात मनिकाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मनिकाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करताना न्यायाधीश रेखा पल्ली यांनी केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली.

राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे नमूद करताना केंद्राने वेगाने पावले उचलणे गरजेचे असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाला टेबल टेनिस महासंघाच्या कारभाराची चौकशी करण्यासही सांगितले आहे.

‘‘मनिका जागतिक क्रमवारीत भारताची सर्वात वरच्या क्रमांकाची खेळाडू आहे. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना महासंघाने समतोल साधणे गरजेचे आहे,’’ असे न्यायाधीश रेखा म्हणाल्या.