भारताविरुद्धची टी-२० मालिका ५-० ने गमावल्यानंतर न्यूझीलंडने वन-डे मालिकेत दमदार पुनरागमन केलं. हॅमिल्टनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारताने दिलेलं आव्हान ४ गडी राखून पूर्ण केलं. शतकवीर रॉस टेलर हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सलामीवीर हेन्री निकोलस आणि कर्णधार टॉम लॅथमने अर्धशतकं झळकावत चांगली साथ दिली. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरीही कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर यांना पहिल्या वन-डे सामन्यात खूप धावा दिल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी या दोन्ही गोलंदाजांना विशेष लक्ष्य केलं होतं. या मालिकेतला दुसरा वन-डे सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्याचा सल्ला अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने केला आहे. “कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंना एकत्र संघात संधी मिळायला हवी. न्यूझीलंडचे फलंदाज जलदगती गोलंदाजांचा आता सहज सामना करु शकतात, पण फिरकीपटूंविरोधात त्यांची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे केदार जाधवला संघाबाहेर करुन आणखी एका फिरकीपटूला संधी मिळायला हवी.”

दरम्यान रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने संघात युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे. मात्र पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांना मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. या मालिकेत आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे ऑकलंडच्या मैदानावर विराट कोहली भारतीय संघात बदल करतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.